राजापूरातील कोदवली धरणाचे मे अखेर पर्यंत काम पूर्ण होणार: नगराध्यक्ष जमीर खलिफे

रत्नागिरी प्रतिनिधी:-
राजापूर शहराला ग्रॅव्हीटीने पाणीपुरवठा करणा-या कोदवली येथील सायबाच्या धरणालगत नव्या धरणाची उभारणी करण्यात येत असून मंगळवारी माजी नगराध्यक्ष अॅड.जमीर खलिफे यांनी धरणाच्या कामाची पाहणी केली. मे अखेरपर्यंत धरणाचे काम पूर्ण होणार असल्याचे अॅड.खलिफे यांनी सांगितले.  
राजापूर शहराला भेडसावणारी पाणी टंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी कोदवली येथील सायबाच्या धरणाच्या जागी नवीन धरण उभारण्यासाठी माजी आमदार अॅड.हुस्नबानू खलिफे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करत सुमारे दहा कोटी रूपयांचा निधी मंजूर करून आणला होता. नोव्हेंबर 2020 मध्ये धरणाच्या कामाची निविदा निघाली आणि 2021 सालात धरणाच्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात झाली असून सद्यस्थितीत धरणाचे काम प्रगतीपथावर आहे. जुन्या सायबाच्या धरणाच्या खालील बाजूस हे नवीन धरण कम बंधारा बांधला जाणार आहे.   
या नव्याने बांधण्यात येणा-या धरणाची लांबी ही सुमारे 50 मीटर असणार असून उंची 9.23 मीटर असणार आहे. या धरणाला दोन्ही बाजुंनी मीटरचे बॉक्स अबाटमेंट असणार आहेत. तसेच धरणातील पाणी सोडण्यासाठी 2 बाय 3 मीटर आकाराचे 17 गेट असणार आहेत. तसेच धरणाच्या वर 2 मीटर रूंदीचा फुटब्रीज असणार आहे. या धरणामध्ये सुमारे 656 सहस्त्र घनमिटर पाणीसाठ्याची क्षमता आहे. धरणाच्या सुरक्षीततेच्या दृष्टीने चारी बाजुंनी रिटनिंग वॉल व वरच्या बाजुला के. टी. बंधारा बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे राजापूरवासियांना स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा होणार आहे.  
दरम्यान मंगळवारी माजी नगराध्यक्ष अॅड.जमीर खलिफे यांच्यासह माजी नगरसेवक व काँग्रेस तालुकाध्यक्ष सुभाष बाकाळकर, सुलतान ठाकूर, संजय ओगले आदींनी धरणाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी ठेकेदार जी.पी.जाधव यांच्याकडून धरणाच्या कामाची माहिती घेतली. यावर्षी मे महिना अखेरपर्यंत धरणाचे काम पूर्ण होण्याची शक्यता अॅड. जमीर खलिफे यांनी व्यक्त केली.

Comments