देवरूख मधील सप्तलिंगी नदीत्रावर उद्या फेरीबोटीची ट्रायल, पर्यटकांना आकर्षित करण्याचा नगराध्यक्षांचा मानस
देवरूख नगर पंचायतीच्या माध्यमातून सप्तलिंगी नदिपात्रात फेरीबोटीची ट्रायल घेतली जाणार आहे. नगराध्यक्ष सौ.मृणाल शेट्ये यांच्या संकल्पनेतून सोमवारी फेरीबोटीसाठी ट्रायल घेण्यात येणार आहे. देवरूख नगर पंचायत देवरुख यांनी शाळा नं १ समोर सप्तलिंगी नदीवर घातलेल्या बांधाऱ्या मुळे नदीचे खूप चांगल्या पद्धतीने पाणी अडवलं गेले आहे. एव्हाना पूर्ण कोरडं दिसणारे नदीचे पात्र यावर्षी पावसाळ्यापेक्षा ही जास्त पाण्याने भरले आहे. यामुळे भुगर्भातील पाण्याची पातळीत वाढ करण्याचा नगर पंचायतीचा उद्देेश सफल झाला आहे. त्या सोबतच नदी पात्रातील या पाण्यावर छोट्या फायबर बोट सोडून त्यातून नागरिकांना फेरी बोटींचा आनंद देता येईल का याची चाचपणी करण्यात येणार आहे. या करिता सोमवार दिनांक १० जानेवारी रोजी प्रायोगिक तत्वावर फुणगुस येथून फायबरची मोटर बोट आणण्याचे प्रयोजन करण्यात आले आहे. तरी या प्रसंगी उद्या सोमवार दिनांक १० जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता शाळा नं. १ येथे उपस्थित राहून फेरीबोटीचा आनंद घ्यावा आणि आपल्या मार्गदर्शक सूचना देखील नोंदवहीमध्ये नोंदवाव्यात असे आवाहन देवरूखच्या नगराध्यक्षा मृणाल शेट्ये यांनी केले आहे.
Comments
Post a Comment