भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाच्या जिल्हाध्यक्षपदी युयुत्सु आर्ते यांची नियुक्ती
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी देवरूख येथील सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशा आशयाचे पत्र नुकतेच त्यांना प्राप्त झाले आहे. मध्यंतरी काही कारणांमुळे न्यासाच्या सर्वच समित्या बरखास्त करण्यात आल्या होत्या. मात्र त्यापूर्वी जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती, दक्षता समिती या पदांवर आर्ते यांनी अण्णा हजारे यांचा प्रतिनिधी म्हणून प्रभावी कामगिरी केली आहे. भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाच्या माध्यमातून भ्रष्टाचाराला आळा घालणारी अनेक आंदोलने झाली. सरकारला माहितीचा अधिकार, दप्तर दिरंगाई, बदल्यांचा कायदा, ग्रामरक्षक दल, लोकपाल यासारखे व्यवस्था परिवर्तन घडवून आणणारे कायदे करायला भाग पाडले. कार्यकर्त्यांच्या आग्रहानुसार पुन्हा नव्याने संघटन बांधणी करण्याचा निर्णय न्यासाने घेतला असून जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे . लवकरच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तालुका समित्या करण्यात येणार आहेत. भ्रष्टाचाराची चीड असणाऱ्या चारित्र्यशील, सामाजिक व राष्ट्रीय दृष्टिकोन असलेल्या कार्यकर्त्यांनी न्यासाच्या जिल्हा, तालुका कार्यकारिणीत काम करण्यासाठी संपर्क साधावा असे आवाहन भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाच्या रत्नागिरी जिल्ह्याचे नवनियुक्त अध्यक्ष युयुत्सु आर्ते यांनी केले आहे. पूर्वीप्रमाणे चारित्र्यसंपन्न कार्यकर्त्यांसह भ्रष्टाचारविरोधी व विविध सामाजिक प्रश्नांवर न्यासाच्या माध्यमातून उत्कृष्ट कामकाज करण्यात येईल असा विश्वास आर्ते यांनी व्यक्त केला. अण्णा हजारे प्रणित जन आंदोलन न्यासाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल सर्व थरातून आर्ते यांचे अभिनंदन होत आहे.
Comments
Post a Comment