रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यावर आढळले जेलीफिश

रत्नागिरी: गेल्या चार-सहा दिवसांपासून रत्नागिरीतील समुद्रकिनाऱ्यावर जेलीफिशचा वावर आढळून आला आहे. हे जेलीफिश सकाळच्या वेळी झुंडीने पाहायला मिळत आहेत. फिकट पांढऱ्या व पिवळ्या रंगाचे हे जेलीफिश अनेक मच्छीमारांना पाहायला मिळत आहेत. मतलई वार्‍यांमुळे मिर्‍याबंदर ते गणपतीपुळे यासह जिल्ह्याच्या अन्य काही किनारी भागात जेलीफिश असल्याचे मच्छीमारांनी सांगितले.
नोव्हेंबर महिन्यामध्ये जेलीफिशचा वावर जिल्ह्याच्या किनारपट्टीवर वाढला होता. डिसेंबर महिन्यात प्रमाण कमी होऊ लागले. परंतु गेल्या आठ ते दहा दिवसात मतलई वारे सुरू झाल्यामुळे जेलीफिशच्या झुंडी रत्नागिरीच्या किनारी भागात आढळत आहेत. मिर्‍यापासून ते गणपतीपुळेपर्यंत मासेमारी करणार्‍यांच्या जाळ्यात जेलीफिश सापडत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसात बांगडा मासा किनारी भागाकडून खोल समुद्राकडे वळला आहे. जेलीफिशच्या झुंडीमुळे मच्छीमारांच्या जाळ्यांचे नुकसान होत आहे.

जेलीफिश म्हणजे काय
जेलीफीश हा आंतरदेहगुही संघाच्या सिफोझोआ वर्गातील एक प्राणी. याचे शास्त्रीय नाव ऑरेलिया ऑरिटा आहे. हे प्राणी जगभरातील महासागरांच्या उथळ तसेच खोल पाण्यात आढळतात. जेलीफिश मांसाहारी असून वलयी प्राणी, लहान मासे, कवचधारी प्राणी, त्यांची अंडी व डिंभ हे त्याचे अन्न आहे. मुखाजवळील बाहूंवर असलेल्या दंशपुटींनी भक्ष्याला अर्धमेले केले जाते आणि बाहूंनी पकडून मुखात घेतले जाते. जठरतंतूंवरील दंशपुटीमुळे भक्ष्य पूर्णपणे मारले जाते. आंतरदेहगुहेत अन्नाचे पचन होते. पचलेले अन्न अरीय नालात व वृत्तनालात जाते. तेथे याचे अभिशोषण होते आणि न पचलेले अन्न मुखावाटे बाहेर टाकले जाते.

Comments