राजापूरातील वाडा तिवरे गावाला विकासाची प्रतिक्षा; समुद्रकिनारा लाभलाय पण जायचा रस्ता झालाय खडतर

रत्नागिरी प्रतिनिधी:-
राजापूर तालुक्यातील वाडा तिवरे गावाला मोठा समुद्रकिनारा लाभलाय. किना-यालगत सुरुबनही आहे. मात्र पर्यटक येतील कसे? इथे जायचा रस्ताच खडतर झालाय. वाडा तिवरे गावातील ग्रामस्थांना विकासाची प्रतिक्षा लागून राहिली आहे.
राजापूर तालुक्यातील राजवाडी गावाची एक वाडी वाडा तिवरे. तालुक्यातून सुमारे एक ते दिड तास या गावात जायला लागतो. गावाला उत्तम समुद्र्किनारा लाभला आहे. पांढरी वाळू आहे. मोठे सुरुबनही आहे. मात्र या गावात जाणारा रस्ता सध्या खड्डेमय झाला आहे. तसेच गावापासून समुद्रकिना-यापर्यंत जाणारा रस्ता कच्च्या स्वरुपाचा आहे. या रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही. या भागात गावची मंदिरे देखील आहेत. रस्ता चांगला नसल्या कारणाने येथील ग्रामस्थ, पर्यटक समुद्रकिना-यापर्यंत पोचू शकत नाहित.
वाडा तिवरे गावात मोबाईल नेटवर्क नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थांना कुणाशी संपर्क साधायचा असेल तर राजवाडीच्या सड्यावर येऊन फोन करावा लागतो. विद्यार्थ्यांनाही ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी गावातून राजवाडी सड्यावर भर उन्हातच दिवसभर थांबावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही खूप त्रास सहन करावा लागत आहे. वाडा तिवरे गावात विज पुरवठा खंडित झाला तर दोन दोन, चार चार दिवस देखील विज पुरवठा सुरळीत होत नाही. गावात एस.टी. वाहतूक नाही. खाजगी वाहतूकही नाही. लोकांना राजापूर, नाटे किंवा रत्नागिरीत जायचे असेल तर गावातून पायी चालत मुख्य रस्त्यापर्यंत सुमारे १ किलोमीटर जावे लागते. त्यानंतरच लोकांना जाण्यासाठी वाहन मिळते. वाडा तिवरे गावाला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला पाहिजे. तो मिळाला तर पर्यटन विकासाच्या माध्यमातून चांगली विकास कामे होऊ शकतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्न-सिंधू योजनेची घोषणा केली होती. या योजनेत या गावाचा समावेश होणे गरजेचे आहे. असे झाल्यास चांगला निधी मिळेल आणि विकासाची कामे होतील. यासाठी पालकमंत्री अनिल परब यांनी या गावात प्रत्यक्ष भेट देऊन तेथील समस्या जाणुन घ्याव्यात. पालकमंत्री अनिल परब यांनी वाडा तिवरे गावात समुद्रकिना-यावर जाऊन स्वत: पर्यटनाचा आराखडा बनवावा. ती गरज आहे. चांगला निधी मिळाल्यास विकासाची कामे होतील. दळणवळणाची साधने उपलब्ध होतील. आरोग्य, वाहतुकीच्या सोयी उपलब्ध होतील. युवकांना चांगल्या रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील.

Comments