रेल्वे प्रवासात प्रवाशाचा मोबाईल लांबवला


   
    रत्नागिरी 21 जानेवारी: गोवा ते पनवेल रेल्वे प्रवासादरम्यान एका प्रवाशाचा 15 हजार रुपये किंमतीचा मोबाईल अज्ञाताने लांबवल्याची तक्रार चिपळूण पोलीस स्थानकात 20 जानेवारी रोजी दाखल करण्यात आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजय मधुकर जायपाटील (56, मुरुड, रायगड) हे थिवीम (गोवा) येथून पनवेल असा रेल्वेने प्रवास करत होते. प्रवासात त्यांना झोप लागली होती. चिपळूण रेल्वे स्टेशन येथे आले असता त्यांनी आपल्या पॅन्टच्या खिशातील मोबाईल चेक केला. मात्र खिशात त्यांना मोबाइल आढळून आला नाही. यानंतर त्यांनी दुसऱ्याच्या मोबाईलवरून मुलाच्या मोबाईलला फोन केला आणि त्यांच्या मोबाईलवर फोन करण्यास सांगितले. यावेळी मोबाईल स्वीच ऑफ असल्याचे मुलाने सांगितले.
 

त्यानंतर संजय जायपाटील यांनी चिपळूण पोलीस स्थानकात 15 हजार रुपये किमतीचा काळ्या रंगाचा एमआय 10 एस कंपनीचा मोबाईल चोरीस गेल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसानी अज्ञातविरोधात भादवी कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस हवालदार शेटकर करत आहेत.


Comments