रत्नागिरी:पेट्रोल पंपावरील कामगाराला 4 ते 5 अज्ञातांनी केली मारहाण..

रत्नागिरी । प्रतिनिधी
शहरानजिकच्या शिरगाव येथील श्रद्धा पेट्रोल पंपावरील कामगारला किरकोळ करणातून 4 ते 5 अज्ञातांनी मारहाण केली. ही घटना मंगळवार 18 जानेवारी रोजी सायंकाळी 7.25 वा. घडली होती.

याबाबत कामगार नीरज राजेंद्र मिश्रा (29, मूळ रा. उत्तरप्रदेश सध्या रा.शिरगाव, रत्नागिरी ) याने 21 जानेवारी रोजी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, मंगळवारी सायंकाळी दोघे जण दुचाकीवरून कॅन मध्ये 50 लिटर डिझेल भरण्यासाठी आले होते. 4 हजार 800 रुपयांचे डिझेल भरून झाल्यानंतर त्यांनी आपल्याकडील एटीएम कार्ड नीरजला स्वाईप करण्यास संगितले.तेव्हा नीरजने स्वाईप मशीन पलीकडे पेट्रोल पंपात असल्याचे सांगून दोघांना तिथे येण्यास सांगितले. याचा राग आल्याने त्या दोघांनी तसेच त्यांच्या इतर 3 ते 4 साथीदारांनी त्याला शिवीगाळ करून लाकडी दांडका आणि केबलच्या वायरने मारहाण केली.याप्रकरणी अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बाजीराव कदम करत आहेत.

Comments