F1 चॅम्पियनचं रोहित शर्माने केलं कौतुक; तर सचिन तेंडुलकर झाला निराश!
अबू धाबी :
रेड बुलचा स्टार ड्रायव्हर मॅक्स वेरस्टाप्पेनने अबू धाबी ग्रांप्रीचे विजेतेपद पटकावले. आपले पहिले विजेतेपद पटकावणाऱ्या या एफ-१ (F1) ड्रायव्हरवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारतीय एकदिवसीय आणि टी-२० संघाचा कर्णधार रोहित शर्माने मॅक्सचे कौतुक केले आहे.
मॅक्स वेरस्टाप्पेनने शेवटच्या लॅपमध्ये लुईस हॅमिल्टनचा पराभव करून हे जेतेपद पटकावले. फॉर्म्युला वन इतिहासातील सर्वात मनोरंजक शर्यतींपैकी एक असलेल्या या शर्यतीत वर्ल्ड चॅम्पियन बनणारा मॅक्स वेरस्टाप्पेन हा पहिलाच डच ड्रायव्हर बनला आहे. रोमांचक शर्यत जिंकणाऱ्या या एफ-१ ड्रायव्हरचे रोहित शर्माने कौतुक केले. एवढेच नाही, तर त्याने मॅक्सच्या विजयाचा संबंध क्रिकेटशी जोडला आहे.
रोहितने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, एका चेंडूत ६ धावांची आवश्यकता आहे आणि मॅक्सने काय मारले याचा अंदाज लावा... अविश्वसनीय विजय. महत्वाची गोष्ट म्हणजे, मायकेल शूमाकरचा ७ वेळा विजेतेपदाचा विक्रम मोडण्याची हॅमिल्टनला संधी होती. तो ही शर्यत जिंकेल, असेच सर्वांना वाटत होते, पण तसे झाले नाही. हॅमिल्टन आणि वेरस्टाप्पेन यांनी शेवटच्या लॅपमध्ये एकत्र सुरुवात केली होती.
वेरस्टाप्पेनने त्याला पहिल्या चार वळणांमध्येच मागे टाकले होते. अखेर हॅमिल्टनला पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर निराश झाला आहे. सचिनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'काय जबरदस्त रेस होती. पहिल्यांचा वर्ल्ड चॅम्पियन झालेल्या मॅक्सचं अभिनंदन. तो पुढे आणखीही यशस्वी होईल, पण मला लुईससाठी वाईट वाटत आहे. सेफ्टी कार नसती, तर ही ट्रॉफी त्याची होती. अतिशय दुर्दैवी. पुढील सिझनसाठी त्याला शुभेच्छा.'
Comments
Post a Comment