सौ.गोदूताई जांभेकर विद्यालयाची वाटचाल शतकपूर्ती कडे


१०० विविध कार्यक्रम व उपक्रमांचा निर्धार

पुष्प १ले: तिमिरातुनी तेजाकडे...स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाने प्रारंभ.

१९२५ झाली तीन मुलींना घेऊन माननीय मालतीबाई जोशी यांनी सुरू केलेली शाळा आता शंभर वर्षाची होत आहे. शताब्दी कडे वाटचाल करताना संस्थेच्या कार्याध्यक्षा आदरणीय शिल्पाताई पटवर्धन यांच्या संकल्पनेतील व शालेय समिती अध्यक्ष आदरणीय आनंद जी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर उपक्रमातील पहिले पुष्प "स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन" या कार्यक्रमाने गुंफले गेले.

यावेळी व्यासपीठावर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह सतीश शेवडे, प्रमुख मार्गदर्शक सत्यवान रेडकर ,प्रभारी मुख्याध्यापक अनिल चव्हाण, शतक महोत्सव शालेय समिती प्रमुख स्नेहल पावरी, ज्येष्ठ शिक्षक नरेंद्र पाटील व शिक्षिका संजना तारी इ.उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागत गीताने झाली. संगीत व हार्मोनियम साथ लाभली शाळेतील शिक्षक शिवाजी बोटके यांची तर तबला साथ राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संतोष गार्डी यांची.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी केले. प्रास्ताविका मध्ये सरांनी कार्यक्रम आयोजनाची भूमिका स्पष्ट केली.विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक नरेंद्र पाटील यांनी अतिथी परिचय करून दिला.

आपल्या मार्गदर्शनात सत्यवान रेडकर सरांनी स्पर्धा परीक्षाना सामोरे जाताना काय करावे काय टाळावे, प्रत्यक्ष अभ्यास कसा करावा इत्यादी गोष्टी हसत खेळत मुलांच्या गळी उतरविल्या. या कार्यक्रमाला 100 हून जास्त विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रवेशद्वारा जवळ शाळेतील शिक्षिका वैभवी नाखरेकर व भाग्यश्री रायकर यांच्या हस्तकौशल्यातून रेखाटन झालेली रांगोळी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती.

कार्यक्रमाच्या अंती माननीय कार्यवाह सतीश शेवडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन अतिथीना गौरविण्यात आले .या कार्यक्रमाचे विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक राजेश कांबळे यांनी ओघवत्या शैलीमध्ये सूत्रसंचालन करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे बहुमोल सहकार्य लाभले. तर आभार शतक महोत्सव शालेय समिती प्रमुख स्नेहल पावरी यांनी मानले.

Comments