जि. प. मध्ये पदभरतीबाबत सत्ताधाऱ्यांसह मंत्र्यांचे दुर्लक्ष- भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन*
*जि. प. मध्ये पदभरतीबाबत सत्ताधाऱ्यांसह मंत्र्यांचे दुर्लक्ष- भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन*
*अधिवेशनात लक्ष्यवेधीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना साकडे*
रत्नागिरी, ता. १० : जिल्हा परिषदेमध्ये वर्ग १ व वर्ग २ ची २४४३ पदे रिक्त आहेत. मंजूर पदे ११४९३ असून फक्त ९०५० भरली आहेत. यामध्ये सरळसेवा, पदोन्नती पदांचा समावेश आहे. शिवसेना सत्तेत असतानाही या पदभरतीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. तसेच पूर्वीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री आणि विद्यमान शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी गेल्या १५ वर्षांत जिल्हा परिषदेकडे म्हणावे तसे लक्षच दिले नाही. त्यामुळे विकासकामे रखडली, गावातील रस्त्यांची वाट लागली. कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. जनता मेटाकुटीला आली आहे, याचे श्रेय सत्ताधारी घेणार का, असा सवाल भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी केला. मंत्री सामंत हे सातत्याने राज्यात सत्ता असलेल्या पक्षात आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून विकासकामांची जनतेची अपेक्षा असते, असेही पटवर्धन म्हणाले.
कोरोना महामारी, टाळेबंदी, लसीकरण असे सर्व सुरू असताना आरोग्य विभागासह अन्य विभागांत रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे विकासकामांवर परिणाम होत आहे. रिक्त पदे तत्काळ भरण्यासाठी आगामी हिवाळी अधिवेशनात आवाज उठवला पाहिजे. याकरिता भारतीयजनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमदार प्रसाद लाड, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रवीण दरेकर यांच्याकडे पाठपुरावा केला आहे.
जिल्हा परिषदेमध्ये वर्ग १, वर्ग २ ची अनेक पदे रिक्त आहेत. शिक्षणाधिकारी- प्राथमिक, निरंतर शिक्षक, उपशिक्षणाधिकारी- माध्यमिक २, प्राथमिक २, लेखाधिकारी शालेय पोषण आहार, अधीक्षक रा. प. (प्राथमिक, माध्यमिक), गटशिक्षणाधिकारी खेड, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, लांजा, दापोली, राजापूर, अधीक्षक- मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण ही पदे रिक्त आहेत. सेवानिवृत्ती, बदली, पदोन्नती अशा कारणांमुळे ही पदे रिक्त असून पुन्हा भरतीच करण्यात आलेली नाही. दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे पदभार दिला जातो. त्यामुळे वेळेवर काम होत नसल्याचा आरोप अनिकेत पटवर्धन यांनी केला.
कृषी विभागामध्ये जिल्हा कृषी अधिकारी, मोहीम अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी (विघयो), कृषी अधिकारी गट ब कनिष्ठ राजपत्रित अधिकारी पदे रिक्त आहेत. आरोग्य विभागात अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी, प्रशासन अधिकारी, सांख्यिकी अधिकारी, जिल्हा विस्तार माध्यमिक अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी जिल्हा प्रशिक्षण पथक आदी पदेही रिक्तच आहेत. अनेक पदे ही गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून रिक्तच असल्याची माहिती जि. प. ने दिल्याचे अनिकेत पटवर्धन यांनी स्पष्ट केले.
माजी मुख्यमंत्री, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमदार प्रसाद लाड, माजी मंत्री, आमदार रवींद्र चव्हाण, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. २२ डिसेंबरपासून चालू होणाऱ्या अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधणार असल्याचे अनिकेत पटवर्धन यांनी पत्रकारांना सांगितले.
*जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची आकडेवारी*
गट, मंजूर पदसंख्या, भरलेली पदे रिक्त पदे
गट क १०७३६ ८६३० २१०६
गट ड ७५७ ४२० ३३७
एकूण ११४९३ ९०५० २४४३
Comments
Post a Comment