हेलिकॉप्टर दुर्घटनेत देशाने बिपीन रावत यांच्यासह गमावले 'हे' योद्धे!

नवी दिल्ली:
भारतीय हवाई दलाच्या एमआय-१७ व्ही ५ हेलिकॉप्टरला बुधवारी दुपारी भीषण दुर्घटनेला सामोरे जावे लागले. तामिळनाडूतील कुन्नूर जिल्ह्यात दाट जंगलात हेलिकॉप्टर कोसळून त्यात देशाचे संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह १३ जणांचा मृत्यू झाला. यात लष्करातील काही प्रमुख अधिकाऱ्यांचा समावेश असून ही नावे बुधवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली आहेत.


हेलिकॉप्टर दुर्घटनेत बिपीन रावत गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत रावत यांची पत्नी मधुलिका, रावत यांच्या स्टाफमधील ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर आणि लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग यांचा मृत्यू झाला. विंग कमांडर पृथ्वीसिंह चौहान, स्क्वाड्रन लीडर के. सिंग, ज्युनिअर वॉरंट ऑफिसर प्रदीप ए., ज्युनिअर वॉरंट ऑफिसर दास, सतपाल राय, नायक गुरुसेवक सिंग, जितेंद्रकुमार, लान्स नायक विवेककुमार, लान्स नायक साई तेजा यांनाही या दुर्घटनेत प्राणास मुकावे लागले.


पृथ्वीसिंह चौहान: दुर्घटनेत मृत पावलेले विंग कमांडर पृथ्वीसिंह चौहान हे आग्रा येथील दयालबागेतील सरन नगरमधील रहिवासी होते. त्यांच्या निधनाने परिसरावर शोककळा पसरली आहे. सुरेंद्र सिंह यांनी पृथ्वी यांच्या निधनाने एकुलता एक मुलगा गमावला आहे.

विवेककुमार: लान्स नायक विवेककुमार हिमाचल प्रदेशातील जयसिंहपूरचे असून रावत यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी होते. रावत यांच्यासह दुर्घटनेत विवेक कुमार यांचेही निधन झाले.


गुरुसेवक सिंग:पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यातील गुरुसेवक सिंग यांचा मृतांमध्ये समावेश आहे. त्यांच्या निधनाने एक कर्तबगार अधिकारी काळाने हिरावून नेला असून जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

साई तेजा: मृतांमध्ये २७ वर्षीय लान्स नायक साई तेजा यांचाही समावेश असून साई तेजा हे आंध्र प्रदेशातील होते. चित्तूर जिल्ह्यात त्यांचे घर असून त्यांच्या पश्चात पत्नी श्यामला, चार वर्षांचा मुलगा मोक्षगना आणि दोन वर्षांची मुलगी दर्शिनी असा परिवार आहे. बुधवारी सकाळीच त्यांनी आपल्या घरी व्हिडिओ कॉल केला होता. तो कॉल शेवटचा ठरला.

जितेंद्रकुमार:दुर्घटनेत मध्य प्रदेशातील जितेंद्र कुमार यांचे निधन झाले. सीहोर जिल्ह्यातील धामंदा गावातील रहिवासी जितेंद्र कुमार हे रावत यांच्या वैयक्तिक सुरक्षा अधिकाऱ्यांपैकी एक होते.

_____________________
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते!
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8999088923



Comments