लहान मुलांसाठी कोविडवरील लस कधी?; पूनावाला यांची खूप महत्त्वाची घोषणा
हायलाइट्स:
-मुलांसाठी पुढील सहा महिन्यांत कोविडवरील लस.
-सीरमचे अदर पूनावाला यांनी दिली महत्त्वाची माहिती.
-कोव्होवॅक्स प्रभावी, चाचणीचे अहवाल सकारात्मक.
नवी दिल्ली:
'सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया 'ने लहान मुलांसाठीची लस येत्या सहा महिन्यांत दाखल करण्याचे नियोजन केले आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी मंगळवारी येथे झालेल्या उद्योजकांच्या परिषदेत ही माहिती दिली.
सीरमच्या कोव्होवॅक्स या लहान मुलांसाठीच्या लशीच्या सध्या चाचण्या सुरू आहेत. या लशीमुळे तीन वर्षांवरील मुलांना संसर्गापासून चांगले संरक्षण मिळेल, असा विश्वास अदर पूनावाला यांनी व्यक्त केला. याबाबत सरकारी घोषणेची आपण प्रतीक्षा करू, असे पूनावाला म्हणाले. आमच्याव्यतिरिक्त दोन कंपन्यांनादेखील लहान मुलांच्या लशीच्या निर्मितीसाठी परवानगी मिळाली असून त्यांच्या लशीही लवकरच उपलब्ध होतील, असेही त्यांनी सांगितले. ‘मुलांचे पूर्ण लसीकरण झाल्यानंतर देशातील शिक्षण क्षेत्राची वाटचाल अधिक जोमाने होण्यास मदत होणार आहे,’ असेही पूनावाला यांनी सांगितले.
चाचणी अहवाल सकारात्मक
लहान मुलांसाठी कोविडवरील लस सहा महिन्यांत बाजारात उपलब्ध करण्याची घोषणा करताना पूनावाला यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. कोव्होवॅक्स या लसची चाचणी घेतली जात आहे. तीन वर्षांपुढील मुलांवर घेतलेल्या चाचण्या सकारात्मक आल्या आहेत. ही लस प्रभावी ठरत आहे आणि कोविड संसर्गाला प्रतिबंध करण्यास सक्षम आहे यावर शिक्कामोर्तब करणारे रिझल्ट्स आले आहेत, असे पूनावाला यांनी नमूद केले. लहान मुलांना करोना संसर्गाची लागण होण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. तरीही लस महत्त्वाची असून त्यासाठीच आमचे प्रयत्न सुरू आहेत आणि सहा महिन्यांत ही लस प्रत्यक्ष उपलब्ध करून देण्यावर आमचा भर आहे, असेही पूनावाला पुढे म्हणाले. सध्या कोविडवरील कोव्हिशील्ड ही सीरमची लस बाजारात उपलब्ध असून १८ वर्षांवरील नागरिकांना ही लस दिली जात आहे. भारताच्या लसीकरण मोहिमेत या लसचं मोठं योगदान राहिलं आहे.
ओमिक्रॉनचा धोका वाढत असतानाच...
देशात करोना संसर्गाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढत चालला आहे. त्यामुळे लसीकरण न झालेल्या १८ वर्षांखालील लहान मुलांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त होत आहे. लहान मुलांचे लसीकरण लवकरात लवकर सुरू केले गेले पाहिजे, असे अनेक तज्ज्ञ सांगत आहेत. त्यावर सरकारी पातळीवर विचारविनिमयही सुरू आहे. अशावेळी पूनावाला यांनी लहान मुलांच्या लसबाबत दिलेली माहिती महत्त्वाची ठरली आहे.
Comments
Post a Comment