हरवलेल्या मोबाईलचा काही मिनिटातच लावला तपास

सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांची कामगिरी
मोबाईल मालक भाईडकर यांनी मानले आभार
सावंतवाडी । प्रतिनिधी : 
सावंतवाडी शहरातील एका फोटो स्टुडिओमध्ये चोरीस गेलेल्या मोबाईलचा सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांनी काही मिनिटातच शोध लावत मोबाईल मालक स्वाती निळकंठ भाईडकर यांच्या तो स्वाधीन केला. हरवलेला मोबाईल पुन्हा मिळाल्यानंतर भाईडकर यांनी स्वाती यादव यांचे आभार मानले.
भाईडकर या पतीसोबत सायंकाळच्या सुमारास शहरातील एका फोटो स्टुडिओमध्ये गेल्या होत्या. त्या ठिकाणी त्यांचा अँड्रॉइड मोबाईल गहाळ झाला. मोबाईल गहाळ झाल्याचे भाईडकर यांच्या लक्षात येताच त्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र, संबंधित चोरट्याने तो कॉल उचलला नाही. यामुळे भयभीत होत त्यांनी पोलीस ठाणे गाठले व घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांना पोलीसांनी याबाबत कल्पना देताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या हातातील काम बाजूला ठेवत हरवलेला तो मोबाईल ट्रॅक केला. पहिल्यांदा त्या मोबाइलचे लोकेशन येथील समाज मंदिर परिसरात दिसून आले. त्यानंतर त्या ठिकाणी पोहोचताच त्या चोरट्यांनी पुन्हा तो मोबाईल घटनास्थळापाशी नेऊन ठेवला. पोलिसांच्या हालचाली पाहून या चोरट्यांनी पुन्हा तो मोबाईल घटनास्थळी ठेवला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. मात्र, तब्बल दोन दिवसांपूर्वी घेतलेला तो मोबाईल पुन्हा भाईडकर यांच्या स्वाधीन होताच भाईडकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांचे मनोमन आभार मानले.

Comments

  1. आमदाराचा मोबाईल होता म्हणून तो काही मिनिटात मिळाला सर्व सामान्याचा असता तर दखल सुद्धा घेतली नसती

    ReplyDelete

Post a Comment