इंग्रजी बोलणाऱ्या दोन अज्ञात भामटयांचा राजापूरात दोन दुकानदारांना गंडा! उडाली खळबळ!
राजापूर:
दोन हजार रूपयांच्या नोटा बघायच्या आहेत असे सांगून दुकानदाराला बोलण्यात गुंग करत दोन भामटयांनी राजापुरातील दोन व्यापाऱ्यांना गंडा घातल्याचा प्रकार पुढे आला आहे. यातील एका व्यापाऱ्याच्या गल्लयातुन सुमारे सात ते आठ हजार रूपये या भामटयांनी लांबविले असून एका मेडिकल मध्ये अशाच प्रकारे पैसे लांबविण्याचा या भामटयांचा प्रयत्न फसला आहे. या भामटयांचे हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या भामटयांच्या प्रतापाचा एक व्हीडिओ व्हायरल झाला असून अपटुडेट कपडयात असलेल्या या भामटयांनी हा प्रकार केल्याचे या व्हीडिओत स्पष्ट दिसून येत आहे.
सोमवारी दुपारी २ ते २.३० वाजण्याच्या दरम्यान शिवाजीपथ रस्त्यालगत असलेल्या एका मिठाई दुकानात व मेडिकल स्टोअर्स मध्ये हा प्रकार घडला आहे. मात्र मंगळवारी सांयकाळी उशीरापर्यंत या प्रकरणी राजापूर पोलीस स्थानकात संबधीत व्यापाऱ्यांकडून कोणतीही तक्रार करण्यात आली नव्हती.
दरम्यान राजापूर तालुका व्यापारी संघाने याची तातडीने गंभीर दखल घेतली असून संबधीत व्यापाऱ्यांना पोलीसांत तक्रार करण्यास सांगितले आहे. तर हा एकूणच प्रकार गंभीर असून शहरातील व्यापाऱ्यांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर यांनी केले आहे.
सोमवारी दुपारी २ ते २.३० वाजण्याच्या दरम्यान दोन अज्ञात व्यक्तींनी हा प्रकार केल्याचे उघड झाले आहे.
शहरातील शिवजीपथ रस्त्यावर असलेल्या राजापूर मेडिकल स्टोअर्स मध्ये या दोन भामटयांनी प्रथम प्रवेश केला. या ठिकाणी शॅम्पू खरेदी केला व त्याचे पैसेही दिले. मात्र त्यानंतर आंम्हाला दोन हजाराची नोट बघायची आहे असे सांगितले. यावेळी उपस्थित असलेल्या कामगारांनी आतमध्ये असलेल्या मालकांना माहिती दिली. मालक तात्काळ बाहेर आले, त्यांनी दोन हजाराची नोट आपल्याकडे नाही असे सांगितले. त्यावेळी या दोघांनीही दुकानाच्या गल्ल्याजवळ प्रवेश करत आत मध्ये शोधण्याचा प्रयत्न केला. तर तेथे असलेल्या बॅग मध्येही हात घालण्याचा प्रयत्न केला. मात्र वारंवार नाही असे सांगूनही त्यांनी ते कळत नसल्याचा आव आणत इंग्रजीमध्ये बोलत आंम्हाला बघायचीच आहे दोन हजाराची नोट असे सांगितले. यावेळी मालकांनी लगतच्या दुकानातुन आणून दाखवतो असे सांगितले. त्यावेळी ते दोघेही या मेडिकल मधून बाहेर पडले व लगतच असलेऱ्या भवानी स्वीट मार्ट मध्ये घुसले, यावेळी मालक रायाराम रायका हे जेवायला गेले होते, तीन कामगार यावेळी दुकानात होते. यावेळी या दोन भामटयांनी दोन हजाराच्या नोटा तपासायच्या आहेत असे सांगून कामगारांना बोलण्यात गुंगवत ठेवत दुकानाच्या गल्ल्यातील सुमारे सात ते आठ हजार रूपये लांबविले आहेत. सायंकाळी हिशेबाच्या वेळी ही बाब लक्षात आल्याचे मालक रायका यांनी सांगितले. तर सीसीटीव्ही फुटेज मध्ये गल्लयात हात घालून पैसे काढल्याचेही दिसून येत आहे.
मात्र या प्रकरणी मंगळवारी सांयकाळी उशीरापर्यंत राजापूर पोलीस स्थानकात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती. व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर यांनी या घटनेनंतर मंगळवारी या दोन्ही व्यापाऱ्यांची दुकानात जाऊन भेट घेतली व माहिती घेतली. याबाबत पोलीसांत तक्रार करा असेही सांगितले. तर व्यापाऱ्यांनी सतर्कता बाळगावी असे आवाहनही मालपेकर यांनी केले आहे.
हे दोन्ही भामटे अपटुडेट कपडे घालुन होते, एकाने चेहऱ्यावर मास्क लावला होता. दोघेही इंग्रजीत बोलत होते, मात्र हळू आवाजात बोलत होते, त्यामुळे त्यांना इंग़्रजीही निट येत नव्हते असे या व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यांची भाषा निट समजून येत नव्हती. मात्र हे भामटे परदेशी वा परराज्यातील वाटत नव्हते, मात्र या घटनेने राजापुरात खळबळ उडाली आहे.
Comments
Post a Comment