रत्नागिरीतील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प मार्गी लागणार? सहा न्यूक्लिअर रिअॅक्टर बसवण्यास केंद्राची तत्वतः मंजुरी
रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत मोठी बातमी आहे. स्थानिक आणि शिवसेनेच्या विरोधामुळे वादात अडकलेल्या या मोठ्या प्रकल्पात सहा न्यूक्लिअर रिअॅक्टर बसवण्यास केंद्र सरकारनं तत्वतः मंजूरी दिल्याची माहिती काल राज्यसभेत देण्यात आली. अणुऊर्जा खात्याचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी काल (गुरुवार) राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली आहे. त्यामुळे रखडलेला जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झालीय. फ्रान्सच्या तांत्रिक सहकार्यातून 1650 मेगावॅट क्षमतेचे सहा न्यूक्लीअर रिअॅक्टर लावण्यास तत्वतः मंजुरी देण्यात आल्यानं 9900 मेगावॅट क्षमतेचा हा देशातला सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प ठरणार आहे.
मागील दहा वर्षापासून कोकणात चर्चा सुरू आहे ती जैतापूर अणुऊर्ता प्रकल्पाची. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील जैतापूर येथे हा अणुऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे. अर्थात स्थानिकांनी याला प्रचंड विरोध करत मोठं आंदोलन देखील उभारलं होतं. शिवसेनेनं देखील स्थानिकांच्या बाजूनं कौल देत आंदोलनाला साथ दिली होती. पण, त्यानंतर देखील गोष्टी हळहळू पुढे सरकत राहिल्या. सध्या या ठिकाणी प्रकल्पासाठी जमिन अधिग्रहित केली गेली असून संरक्षण भिंत देखील उभारली गेली आहे. पण, काम मात्र अद्याप अपेक्षित अशी गती पकडताना दिसत नाही. पण, त्यानंतर देखील आता या प्रकल्पाची चर्चा सुरू झाली आहे. त्याला कारण ठरलं आहे ते केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी राज्यसभेत दिलेलं लेखी उत्तर. ‘जैतापूर प्रकल्पाच्या ठिकाणी 1650 मेगावॅट क्षमतेच्या सहा अणुभट्या उभारल्या जाणार आहेत. त्यासाठी फ्रान्स सोबत करार झाला असून यातून जवळपास 9900 मेगा वॅट इतकी विज निर्मिती केली जाणार आहे.’ दरम्यान, मध्यंतरीच्या काळात प्रकल्पाबाबत काहीही हालचाल दिसत नसल्यानं विविध चर्चा सुरू झाल्या होत्या. पण केंद्रीय मंत्री सिंह यांनी दिलेल्या उत्तरामुळे केंद्र सरकार याबाबत सकारात्मक असल्याचि दिसून आलं आहे.
Comments
Post a Comment