१९९५ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे ‘ब्लॉसम-९५’ स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण आणि जल्लोषात संपन्न
जीजेसी-९५-फॅमिली-कॉलेज कट्टा या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या
१९९५ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे ‘ब्लॉसम-९५’ स्नेहसंमेलन
उत्साहपूर्ण आणि जल्लोषात संपन्न
दि. १९ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत जीजेसी-९५ फॅमिली-कॉलेज कट्टा या ग्रुपवरील गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील १९९५ च्या बॅचचे माजी विद्यार्थी ‘ब्लॉसम-९५’ या स्नेहसंमेलनाकरीता एकत्र आले होते. या ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक भान ठेऊन विविध सामाजिक हिताचे उपक्रम सातत्याने हाती घेतले जातात. खुप वर्षांनी मोठ्या प्रमाणावर एकत्र येत समूह सदस्यांनी आकर्षक आणि दिलखेचक असे विविध गुणदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
गोगटे जोगळेकर महाविद्यालायाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात संपन्न झालेल्या ‘ब्लॉसम-९५’ या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालायाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. नटराज पूजा आणि दीपप्रज्वलन झाल्यानंतर श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांनी आपले विचार मांडताना ‘माजी विद्यार्थ्यांचे अशाप्रकारे महाविद्यालयात एकत्र येऊन महाविद्यालायाप्रती आपली आस्था दाखविणे कौतुकास्पद असल्याचे सांगितले.’ त्यांनी वेळ देऊन सादर झालेल्या विविधरंगी कार्यक्रमांचा आस्वाद घेतला. प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच समूह सदस्यांशी संवाद साधताना आपल्याला खूप प्रसन्न वाटत असल्याचे नमूद करून अशाप्रकारे माजी विद्यार्थी महाविद्यालयात एकत्र येऊन महाविद्यालयाप्रती आपली बांधिलकी दाखवत असतील तर ही बाब निश्चितच कौतुकास्पद असल्याचे सांगितले. कार्यक्रमादरम्यान ग्रुपचे सदस्य श्री. नितीन मिरकर यांनी गोगटे जोगळेकर महाविद्यालायाकरिता रु. ५०,००० ची देणगी जाहीर केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांनी समूह सदस्य कै. संजीव साळवी यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर झालेल्या विविधरंगी कार्यक्रमात समूह सदस्यांनी गाजलेल्या मराठी आणि हिंदी चित्रपटातील सुमधुर गीते सादर केली. तसेच नाटुकले, समूह नृत्य अशा विविध रंगीबिरंगी कार्यक्रमांनी नटलेली ही संध्याकाळ खूपच अविस्मरणीय झाली. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती मुळ्ये आणि प्रशांत सागवेकर यांनी केले. रंगमंच व्यवस्था अमरिश सावंत यांनी केली. सत्यशील सावंत यांनी कार्यक्रमाची तांत्रिक बाजू सांभाळली. या स्नेहसंमेलनाकरीता विविध ठिकाणी राहणारे समूह सदस्य खूप वर्षांनी एकत्र आले होते. खऱ्या अर्थाने ही संध्याकाळ ‘यादगार’ झाली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बिपीन बंदरकर, नितीन मिरकर, श्रीकांत दुदगीकर, संकेत घाग, बिपीन शिवलकर, शेखर कवितके, सोनाली बंदरकर, अनघा दामले, राजश्री शिवलकर, पल्लवी मिरकर, रश्मी कीर आणि अनेक समूह सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment