वादळ,अवकाळीमुळे १०० नौका अजूनही किनाऱ्यावरच!!

रत्नागिरी : 
अवकाळी पाऊस आणि तत्पूर्वी आलेल्या वादळानंतर मासेमारीसाठी पोषक वातावरण निर्माण होईल असा अंदाज होता. मात्र परिस्थिती जैसे थे असून वातावरणातील अचानक झालेल्या बदलांनी मच्छीमारांची हंगामाबाबतची गणिते बिघडली आहेत. नौका समुद्रात जात असल्या तरीही खर्च सुटेल इतकीही मासळी हाती येत नसल्याचे मच्छीमारांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे तीनशे पर्ससीन, मिनी पर्ससीन नौका आहेत. पावसाळी बंदी उठल्यानंतर मासेमारी १ सप्टेंबरपासून सुरू झाली. मासेमारीच्या प्रारंभापासूनच मासळी कमी मिळत होती. रोजच्या खर्चाइतकीही मासळी मिळत नसल्याने अनेक नौका मालकांची आर्थिक स्थिती बिघडू लागली. गेला आठवडाभर सुमारे १०० नौका मालकांनी नौका समुद्रात मासेमारीसाठी सोडल्या नाहीत.

एक आठवड्याची मासेमारी करण्यासाठी १५ बॅरल डिझेल लागते. याची किंमत सुमारे ३ लाख होते. त्याचबरोबर १० टन बर्फ नौकांमध्ये ठेवावा लागतो. याची किंमत १५ हजार रुपये होते. नौकांवर काम करणार्‍या खलाशांना आठवडाभराचे जिन्नस आणि गॅस सिलिंडर द्यावा लागतो. पिण्यासाठी ६ हजार लिटर्स पाणीही द्यावे लागते. हा खर्च ३० ते ३५ हजारापर्यंत असतो. आठवडाभरानंतर नौकांवरील खलाशांना भत्ता किंवा आठवड्याचा हप्ता द्यावा लागतो. एका नौकेचा हा खर्च सुमारे ५० हजार रुपयांपर्यंत जातो. आठवड्याचा इतका मोठा खर्च करून मासळीचा रिपोर्ट मिळत नसल्याने अनेक नौका मालकांची आर्थिक स्थिती दोलायमान झाली. त्यामुळे हा खर्च कमी करण्यासाठी नौका समुद्रात न पाठविण्याचा निर्णय घेतला गेला. मात्र अशा परिस्थितीत खलाशांना हप्ता किंवा आठवड्याचा भत्ता द्यावाच लागला. आठवडाभरानंतर पैशाची व्यवस्था करून बंद असलेल्या नौका शनिवारपासून मासेमारीसाठी समुद्रात पाठवण्यात आल्या आहेत. सध्या बांगडी मासा मिळत असून त्याला दरही एका डिशला आठशे रुपये मिळत आहेत.

Comments