फडणवीसांच्या मनात 'ती' सल असल्यामुळेच मला माफी मागायला लावली: भास्कर जाधव!

मुंबई: 
गेल्या अधिवेशनात मी तालिका अध्यक्ष असताना भाजपचे १२ आमदार निलंबित झाले होते. त्याची सल भाजपच्या मनात अजूनही आहे. माझ्याविरुद्ध त्यांना काहीच कारण मिळत नव्हते. त्यामुळे आज माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मी पंतप्रधानांचा अपमान केला, असे वातावरण निर्माण करण्यात आले आणि मला माफी मागायला लावण्यात आली, असे वक्तव्य शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव  यांनी केले. आजचा प्रसंग पाहता मी १२ आमदारांना निलंबित केल्याची सल भाजपच्या मनात कायम आहे, हे स्पष्ट झाल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटले.

देशातील प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार, हे वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान नसतान केले असे सांगून देवेंद्र फडणवीस हे शब्दच्छल करु पाहत होते. त्यामुळे मीदेखील तेच केले. नरेंद्र मोदी यांनी ते वक्तव्य पंतप्रधान होण्यापूर्वी केले होते. त्यामुळे मी पंतप्रधान नव्हे तर भाजपच्या उमेदवाराची नक्कल केली, असा शब्दच्छल मी केला. भाजपने केलं तर सगळं चालतं, पण इतरांनी केलं तर चालत नाही, असे भास्कर जाधव यांनी म्हटले. या सगळ्या वादानंतर माझ्या पक्षातील वरिष्ठांनीही मला माघार घेण्याचा सल्ला दिला. माफी मागण्याने माणूस लहान होत नाही. त्यामुळे मी सभागृहात माफी मागितल्याचे भास्कर जाधव यांनी सांगितले. यानंतर देवेंद्र फडणवीस यांना माझ्याविरोधात हक्कभंग आणायचा असेल तर तो त्यांनी जरुर आणावा. मी त्याला सामोरा जायला तयार आहे, असे फडणवीस यांनी म्हटले.

सभागृहात नक्की काय घडल
सभागृहात चर्चा सुरु असताना नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीदरम्यान दिलेल्या १५ लाखांच्या आश्वासनाचा मुद्दा उपस्थित झाला. उर्जामंत्री नितीन राऊत हे एका प्रश्नावर उत्तर देत असताना या सगळ्या वादाची सुरुवात झाली. यावेळी करोनामुळे आपल्याला १०० युनिट वीज मोफत देण्याच्या आश्वासनाची पूर्ती करता आली नाही, असे सांगितले. याचे समर्थन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख रुपये देण्याच्या आश्वासनाचा उल्लेख राऊत यांनी केला. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी, नरेंद्र मोदी कधीच असे बोलले नाही, असा दावा केला. त्यावर भास्कर जाधव यांनी जागेवर उभे राहत नरेंद्र मोदी यांची नक्कल करत काही वाक्यं बोलून दाखवली. हे पाहून देवेंद्र फडणवीस यांच्या संतापाचा पारा चढला. सभागृहात देशाच्या पंतप्रधानांची नक्कल करणे, हे योग्य नव्हे. सभागृहात अशाप्रकारचा पायंडा पडता कामा नये, असे फडणवीस यांनी म्हटले.

Comments