जिल्हास्तर खेलो इंडिया बॅडमिंटन प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

रत्नागिरी:
जिल्हा क्रीडा संकुल रत्नागिरी येथे बॅडमिंटन या खेळाकरीता जिल्हास्तरीय खेलो इंडिया बॅडमिंटन प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष ओंकार हजारे, श्रीमती सरोज सावंत आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी उपस्थित खेळाडूंशी संवाद साधला व त्यांनी बॅडमिंटन प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून खेळामध्ये उत्तम कौशल्य प्राप्त करुन भविष्यात उज्वल कामगिरी करावी अशा शुभेच्छा दिल्या.

क्रीडा मंत्रालय, केंद्र शासनाच्या अंतर्गत खेलो इंडिया या योजनेमधून देशातील विविध जिल्ह्यांमध्ये एक हजार खेलो इंडिया सेंटर पुढील चार वर्षामध्ये निर्माण करण्यात येणार आहेत. क्रीडा क्षेत्रातील उच्च पातळीच्या कामगिरीसाठी, प्रतिभावान खेळाडूंचा विकास , त्यांची क्षमता वाढविण्याचे काम या केंद्राद्वारे होणार आहे. जिल्हा क्रीडा संकुल रत्नागिरी येथे सुरू झालेल्या जिल्हास्तरीय खेलो इंडिया बॅडमिंटन प्रशिक्षण केंद्रामध्ये १५ मुले व १५ मुली यांची निवड केंद्र शासन व भारतीय खेळ प्राधिकरण यांच्या मानकांप्रमाणे करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी दिली.

Comments