'बड्या धेड्यांचा 'थंडागरम डाव उद्धवस्त!!!लांजात खळबळ; पैशांचे मोजमाप उशिरापर्यंत
रत्नागिरीः-
लांजा तालुक्यातील कोर्ले- भांबेड मार्गावर
असलेल्या एका हॉटेलमध्ये लांजातील ‘बड्या धेड्यांचा जुगाराचा डाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उध्वस्त केला. यामध्ये लांजातील मोठ्या व्यावसायिकांसह बडे नाव
असलेले अनेक जण पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती.सुमारे १५ ते २० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते, तर डावात लावलेल्या पैशांचे मोजमाप उशिरापर्यंत सुरू होते.मात्र पोलीस प्रशासनाने अधिकृत माहिती देण्याचे कटाक्षाने टाळले. तर लांजात मोठ्या प्रमाणात जुगार सुरु असताना लांजा पोलीस करतात काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.लांजा तालुक्यातील कोर्ले- भांबेड मार्गावरील कोर्ले तिठ्यापासून जवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये शुक्रवारी
सायंकाळपासून लांजा शहरासह पंचक्रोशीतील ‘बड्या धेड्यां'चा जुगाराचा डाव होणार असल्याची माहिती स्थानिक
गुन्हे शाखेला मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक शुक्रवारी रात्री कोर्ले तिठा
येथे दाखल झाले.या कारवाईपासून लांजा पोलिसांना अलिप्त ठेवण्यात आले होते.स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी
छापा टाकल्यानंतर या छाप्याची माहिती लांजा पोलिसांना मिळाली. त्यानंतर लांजा पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षकांसह बीट अंमलदार यांनी घटनास्थळी दाखल झाले होते. या हॉटेलमध्ये सुमारे १५ ते २० बडीधेडी लाखो रुपयांचा जुगार खेळत होती. छापा टाकल्यानंतर सर्वांचीच तारांबळ उडाली. काहीजण पळण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. घटनास्थळावर सापडलेल्या सर्वांचा जबाब नोंदविण्याचे काम सुरु घटनास्थळी सापडलेली रोख रक्कम याचे मोजमाप रात्री
उशिरापर्यंत सुरू होते. तर अलिशान वाहनेही हॉटेल बाहेर उभी होती. ती पोलिसांनी जप्त केली की नाही याची माहिती रात्री उशिरापर्यंत उपलब्ध झाली नव्हती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्याशी संपर्क केला असता लांजा येथील कोर्ले -भांबेड येथे स्थानिक गुन्हे
शाखेच्या पथकाने छापा टाकला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.परंतु पोलिसांचा तपास सुरू असून घटनास्थळावरून तपशील उपलब्ध झाला नसल्याचे त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. लांजातील बड्या धेंडांच्या जुगारावर पोलिसांनी छापा टाकून त्यांना ताब्यात घेतल्यामुळे लांजा तालुक्यात खळबळ उडाली आहे. सर्व क्षेत्रातील बडी
धेडी यामध्ये सहभागी असल्याचे खात्रीलायक वृत्त असून शनिवारी पोलिसांची कारवाई अंतिम झाल्यानंतर या कारवाईत कोणती धेडी अडकली हे स्पष्ट होणार आहे.
Comments
Post a Comment