ट्रक वाहतूकदारांकडून सिमेंट वाहतूक बंद

ट्रक वाहतूकदारांकडून सिमेंट वाहतूक बंद

रत्नागिरी-
पेट्रोल-डिझेलचे दर, लाखो रुपयांच्या कर्जाचा भार, हमाल खर्च अशा कारणांनी ग्रासलेल्या ट्रक वाहतुकदारांना भाडेवाढ मिळत नसल्याने जिल्हा मोटार मालक असोसिएशनने जिल्ह्यातून होणारी सिमेंटची वाहतूक शनिवारपासून बंद केली आहे. 

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे येथील ट्रक मालक मोठ्या अडचणीत आले आहेत. यासंदर्भात येथील असोसिएशनच्या कार्यालयात निर्णय घेण्यासाठी बैठक झाली. या बैठकीत लोडींग-अनलोडींग या विषयावर देखील चर्चा झाली. ज्या कंपन्यांमधून माल वाहतूक केली जाते, त्या कंपन्यांकडे वाहतुकीचे दर वाढवून मिळावेत, अशी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. डिझेलचे दर वाढत असताना माल वाहतूक करणे आवाक्याबाहेरची बाब आहे.मालवाहतुकीसाठी लाखो रुपयांची कर्जे काढून गाड्या घेतलेल्या आहेत. पण त्या गाड्यांचे हप्ते कसे फेडणार? असा मोठा प्रश्‍न ट्रक वाहतुकदारांसमोर उभा असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष विकास सावंत यांनी सांगितले.

येथील कंपन्यांचा सिमेंटचा माल आजपर्यंत सुरक्षितरित्या पोचवला जात आहे. पण कंपनीकडून दरवाढ देण्यास नकार दिल्याचे सावंत यांनी त्या बैठकीत स्पष्ट केले. बैठकीला उपाध्यक्ष बंड्या साळवी, चिटणीस दीपक साळवी, सरचिटणीस रोशन फाळके, विलास मुळ्ये, वसंत पाटील, नासीर वाघू आदी उपस्थित होते.

Comments