*जि. प. मधील वाझे शोधण्याची हीच ती वेळ- अनिकेत पटवर्धन*

*जि. प. मधील वाझे शोधण्याची हीच ती वेळ- अनिकेत पटवर्धन*

▪️*जि. प.च्या आंतरजिल्हा शिक्षक बदल्याप्रकरणी आमदार प्रसाद लाड हिवाळी अधिवेशनात मांडणार प्रश्न*
▪️*३७० पैकी ५७ शिक्षक जिल्ह्यातून मुक्त*
▪️*बदल्यांत 'अर्थ'पूर्ण व्यवहार झाल्याचा संशय*

*रत्नागिरी* : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील ३७० शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे आला आहे. यातील ५७ शिक्षकांना बदली दिल्याचे माहिती समजते. परंतु 'अर्थ'पूर्ण व्यवहार झाल्याचा संशय आहे. महाविकास आघाडीतले रत्नागिरी जि. प. मधील वाझे शोधण्याची हीच ती खरी वेळ आहे. महाविकास आघाडीने केलेल्या सर्व कामांचा पर्दाफाश केला जात आहे, असे सांगत शिक्षकांच्या प्रश्नी विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता युवा मोर्चाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी दिली.

याबाबत अनिकेत पटवर्धन यांनी पत्रकारांना सांगितले, जिल्हा परिषदेच्या बदल्या नेहमीच गाजतात. शिक्षकांच्या बदल्यांप्रकरणी गैरकारभार झाला असण्याची शक्यता आहे. याबाबत चर्चाही सुरू आहे. याबाबत जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांनी लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यात १० टक्के पर्यंत शिक्षकांची पदे रिक्त असताना सध्या मात्र १४.५ टक्के शाळा शिक्षकांविना आहेत. ही पदे रिक्त असताना आंतरजिल्हा शिक्षकांच्या बदल्या का केल्या याची चौकशी करण्यात यावी.

या बदल्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे प्राथमिक अंदाजानुसार बोलले जात आहे. याशिवाय जिल्ह्यात कमी पटसंख्या असल्याच्या शाळा बंद करण्याचा घाट घातला जात आहे. शासनाचे नियम धाब्यावर बसवून हा कट दिसत आहे. तसेच शिक्षकांच्या अशा बदल्या करणे चुकीचे आहे. त्यामुळे या बदल्यांना भारतीय जनता युवा मोर्चाचा विरोध राहील. या बदल्या जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जाखड यांनी थांबवाव्यात. या प्रश्नी माहिती घेण्यात आली आहे, त्याद्वारे आमदार प्रसाद लाड अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करणार असल्याचे अनिकेत पटवर्धन यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीतले रत्नागिरी जि. प. मधील वाझे शोधण्याची हीच ती खरी वेळ आहे. महाविकास आघाडीने केलेल्या सर्व कामांचा पर्दाफाश केला जात आहे. विरोधी पक्ष म्हणून भाजपा सक्षम आहे. प्रत्येक गोष्ट रेटवून नेण्याचा प्रयत्न चालवला आहे, ते चालणार नाही. जि. प. च्या सर्व गोष्टींकडे विरोधी पक्ष म्हणून आमचे बारीक लक्ष आहे. अर्थपूर्ण कारभाराची चौकशी व्हावी आणि ५७ शिक्षकांना परत माघारी बोलवावे, त्यासंबंधीचे आदेश जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढावेत, अशी मागणी अनिकेत पटवर्धन यांनी केली. तसेच जि. प. माजी उपाध्यक्ष, माजी शिक्षण सभापती सतीश शेवडे यांना जि. प. मधील कामाचा अनुभव असल्याने त्यांच्यासमवेत आपण मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटून यासंबंधी चर्चा करणार असल्याची माहिती पटवर्धन यांनी दिली.

Comments