अनधिकृत लसीकरण प्रकरण
*अनधिकृत लसीकरण प्रकरण*
*राजकीय दबावामुळेच गुन्हे नोंदवण्यात दिरंगाई - अनिकेत पटवर्धन*
*अधिवेशनात लक्ष्यवेधी मांडणार- प्रसाद लाड*
रत्नागिरी : कोरोना काळात लस उपलब्ध झाल्यानंतर रत्नागिरीतील केतन मंगल कार्यालयात २४ एप्रिल २०२१ रोजी अनधिकृत लसीकरण कॅंप घेण्यात आला. याबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झालेला नाही, अशी माहिती भारतीय जनता युवा मोर्चाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी दिली. या प्रकरणी विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड हे आगामी अधिवेशनात लक्ष्यवेधी मांडणार असल्याचेही पटवर्धन यांनी स्पष्ट केले. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गुन्हे नोंदवणे आवश्यक होते. परंतु कोणाच्या राजकीय दबावाला बळी पडून गुन्हे नोंदवण्यात दिरंगाई होत आहे, असा सवाल अनिकेत पटवर्धन यांनी केला.
सर्वसामान्य जनतेला रांगेत उभे राहून लस मिळवावी लागत असताना शिवसेना शहरप्रमुखांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून दोनशे पन्नास जणांचे लसीकरण केले. या व्यक्तींची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली नव्हती. त्यामुळे या प्रकरणी भाजपाने तक्रार नोंदवली होती. जिल्हाधिकारी, पोलिसांकडे तक्रार दिली होती. या प्रकरणाचा योग्य पाठपुरावा मी करत असल्याचे अनिकेत पटवर्धन यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून २८ एप्रिल रोजी या प्रकरणी प्रधान सचिवांकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. यामध्ये म्हटले होते की, कोविडच्या नियमांचे पालन या कॅंपमध्ये करण्यात आले नाही. लसीकरण केंद्रावर गर्दी दिसून आली. बैठक व्यवस्थेमध्ये सामाजिक अंतर राखलेले नव्हते. यासंबंधी वृत्तपत्रांमध्ये बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. या अनियमिततेबाबत तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांना सर्वस्वी जबाबदार धरून महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ नुसार कारवाई करणेबाबत कारणे दाखवा नोटीस मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून बजावण्यात आल्या होत्या. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा खुलासा असमाधानकारक आहे. याबाबत पुढील कार्यवाही करण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी प्रधान सचिवांना केली होती.
या प्रकरणानंतर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. बदली झाली म्हणून कारवाई नाही, हे शक्य नाही. डॉ. कमलापूरकर यांची बदली झाली असली तरी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना निलंबित करून त्या दोघांसह आयोजकांवरही गुन्हा नोंदवावा, अशी आग्रही मागणी आहे. हे शिबिर अनधिकृत असल्याचे प्रशासनाने मान्य केले व संबंधितांवर कारवाई केली पाहिजे याबाबतही त्यांनी सूचना दिल्या होत्या. परंतु आजतागायत गुन्हे दाखल झाले नाहीत. त्यामुळे येत्या अधिवेशनात भाजपाचे आमदार प्रसाद लाड तीव्रपणे भूमिका घेणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या प्रकरणात कारवाई केलेली नाही.
या संबंधी भाजपाने जिल्हा पोलिसांकडेही तक्रार केली होती. पक्षीय दबावाला बळी पडल्यानेच गुन्हे नोंदवण्यात दिरंगाई होत आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करावा. आता कोविडचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. याबाबत माजी मुख्यमंत्री, विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत प्रशासनाला धारेवर धरू, असे प्रतिपादन अनिकेत पटवर्धन यांनी केले.
Comments
Post a Comment