आंबा बागायतदारांचे २३ डिसेंबरलाआझाद मैदानावर धरणे आंदोलन


रत्नागिरी-
कोरोना कालावधीतही बागायतदार अडचणीत आले असतानाच अवकाळी पावसाने हापूस उत्पादकांचे कंबरडे मोडलेले आहे. अनेक बागायतदारांच्या थकीत कर्जापोटी बँकांनी वसुलीच्या नोटीस धाडल्या आहेत. कर्ज न भरल्यास मालमत्तेवर टाच आणण्याची तयारीही बँकांनी केली आहे. ही परिस्थिती अशीच राहीली तर आत्महत्या करण्याची वेळ सर्वसामान्य बागायतदारांवर येऊ शकते. कोकणातील या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या 23 डिसेंबरला मुंबईत आझाद मैदानावर बागायतदारांचे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे आंबा बागायतदार बावा साळवी यांनी सांगितले.

कोकणातील आंबा, काजू, नारळ आदी फळबागायतींमधून शेतकरी व शेतमजुर यांना रोजगाराची संधी उपलब्ध होते. अनेकांच्या कुटूंबाचे उदरनिर्वाहाचे हे एकमेव साधन आहे. गेली 15 वर्षे निसर्गाच्या बदलातुन वादळ, वारा व अकाली पाऊस, ढगाळ वातावरण, रासायनिक प्रदुषण यामुळे बागायतदार शेतकर्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात आंबा, काजू आदी फळझाडांना चांगले मोहोर आले असतानाच अवकाळी पाऊस पडून मोहोरावर किड, करपा, बुरशी व भुरी आदी रोगांची लागण होऊन फळ पिकांची मोठया प्रमाणात हानी झाली असल्याचे सांगण्यात आले.

अडचणीत आलेल्या हापूस उत्पादकांच्या प्रश्नाबाबत शासनाला वारंवार निवेदने देऊनही त्याची दखल घेतली जात नसल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी बागायतदार संघटनेचे तुकाराम घवाळी, दिपक राऊत आदी उपस्थित होते.

Comments