५४ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद पुरुष-महिला खो-खो स्पर्धेसाठीमहाराष्ट्राचे संघ जबलपूर मध्ये दाखल
मुंबई, २५ डिसेंबर, (क्री. प्र.): ५४ वी राष्ट्रीय अजिंक्यपद पुरुष-महिला खो-खो स्पर्धा २६ ते ३० डिसेंबर २०२१ या कलावधीत एमएलबी खेळ परिसर, राईट टाऊन, जबलपूर, मध्य प्रदेश येथे आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ जबलपूरला रवाना झाले आहेत. सोलापूर येथे ५७ व्या पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेतून निवड झालेल्या महाराष्ट्राच्या पुरुष संघांचे राष्ट्रीय स्पर्धा पूर्व प्रक्षिक्षण शिबीर राज क्रीडा मंडळाच्या क्रीडांगणावर, कुळगाव, जि. ठाणे येथे किशोर पाटील यांच्या सहकार्याने पार पडले तर महिला संघाचे शिबीर रा. फ. नाईक विद्यालयात पार पडले.
पुरुष संघाचे प्रक्षिक्षक बिपीन पाटील (मुंबई) व महिला संघ प्रक्षिक्षक महेश (मयूर) पालांडे (ठाणे) यांनी या शिबिरात खेळाडूंकडून कसून सराव करून घेतला आहे. गतवेळी महाराष्ट्राच्या दोन्ही संघांचा अंतिम सामन्यात पराभव झाला होता. छत्तीसगड येथे गेल्या वेळी (२०१९-२०) पुरुष संघाला रेल्वे कडून तर महिला संघाला भारतीय विमानतळ प्राधिकरणा कडून पराभव पत्करावा लागला होता.
या वर्षी महाराष्ट्राच्या सब जूनियर (किशोर-किशोरी) व जूनियर (कुमार-मुली) खो-खो संघांनी सुवर्ण पदक पटकावताना दुहेरी मुकुट मिळवला होता. त्यामुळे महाराष्ट्राचे पुरुष महिला संघ सुध्दा सुवर्ण पदकासह दुहेरी मुकुट मिळवताना हॅट्रिक करणार का? याकडे संपूर्ण खोखो रशिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
महाराष्ट्राच्या संघांना गेली काही वर्ष भारतीय रेल्वे व भारतीय विमानतळ प्राधिकरण हे फक्त आव्हानच देत नाहीत तर महाराष्ट्रा कडून विजयाचा घास हिरावून घेत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रक्षिक्षक बिपीन पाटील व महेश (मयूर) पालांडे यांच्याशी चर्चा केली असता यावेळी आम्हीच जिंकणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या वेळेपेक्षा यावेळी आम्ही थोडी वेगळी रणनीती आखली असल्याचे बिपीन पाटील तर यावेळचा महिलांचा संघ अधिक उजवा असल्याचे महेश पालांडे यांनी संगितले.
या स्पर्धेत साखळीत महाराष्ट्राचा पुरुष संघ तेलंगणा, हरयाणा, हिमाचल प्रदेश व नागालँड या संघांबरोबर तर महिला संघ विदर्भ, मध्य भारत, अंदमान-निकोबार व नागालँड या संघांबरोबर खेळेल.
आज महाराष्ट्राच्या दोन्ही संघांचा निरोप समारंभ रा. फ. नाईक विद्यालयाच्या पार पडला. यावेळी भारतीय खोखो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस गोविंद शर्मा, खजिनदार अरुण देशमुख, संदीप तावडे, सहसचिव गंधाली पालांडे, कमलाकर कोळी, मंदार कोळी, किशोर पाटील, रा. फ. नाईकचे प्राचार्य खळे व अनेक पदाधिकारी व खो-खो कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून खेळाडूंना विजयी होण्यासाठी मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment