ज्यांनी पेपर फोडला, ते अजून फुटले नाहीत, म्हणून पेपर वारंवार फुटतो : राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. औरंगाबादमध्ये विविध ठिकाणी भेट दिल्यानंतर राज ठाकरे पुण्याच्या दिशेने रवाना होणार आहेत.
ज्यांनी पेपर फोडला, ते अजून फुटले नाहीत, म्हणून पेपर वारंवार फुटतो, असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोला लगावला आहे. तसेच ओबीसी आरक्षणावरुन बोलताना निवडणुका पुढे ढकलण्यासाठी ओबीसी आरक्षणाचा गोंधळ?, असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. औरंगाबादमध्ये विविध ठिकाणी भेट दिल्यानंतर राज ठाकरे पुण्याच्या दिशेने रवाना होणार आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, "हे काय पहिल्यांदा होतंय असं नाही, असं काही नाही की पेपर फुटला तो पहिल्यांदा फुटला आहे. इतक्या वर्षे अनेकदा फुटला. पण ज्यांनी फोडला ते फुटले नाहीत अजून, म्हणून सारखे पेपर फुटतात. ज्याप्रकराचा शासन म्हणून एक वचक असायला पाहिजे, तो वचक राहत नाही मग."
मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, "कोरोनानंतर बाहेर पडलो. आपल्या देशात निवडणुका येतच राहतात. त्यामुळे निवडणुकीसाठी बाहेर पडलो असं म्हणू शकत नाही. आता फेब्रुवारीत तारखेनुसार, निवडणुका होतील असं वाटत नाही. औरंगाबादची निवडणूक वर्षभर पुढे ढकलण्यात आली. ज्या निवडणुका आहेत, त्यांची खात्री नाहीये होतील की, नाही? की, त्या आणखी सहा-आठ महिने पुढे जातील. की, यामुळेच ओबीसी आरक्षणाचं नवं प्रकरण सुरु केलंय?
"केंद्रानं मोजायचे की, राज्यानं मोजायचे आणि मग त्या मोजामोजीमध्ये पुढच्या सगळ्या निवडणुका पुढे ढकलायच्यात? कारण अनेक ठिकाणी पाट्या लावायला सुरुवात झाली. आमच्याकडे मतं मागायला येऊ नका अशा पाट्या लावल्या लोकांनी. हा गोंधळ घातल्यामुळे ह्यांची हिंमत नाही लोकांकडे जायची. काहीतरी कारणं काढून हे निवडणुका पुढे ढकलतील किंवा घेतली, याची कोणतीच खात्री नसताना मी बाहेर पडलो असेल किंवा माझ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत असेल, तर पाहायचं मी कोणत्या अर्थानं बाहेर पडलोय.", असं राज ठाकरे म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, "अर्थ असणारच आहे ना तुम्ही देखील आज माझ्याकडे कुठल्यातरी अर्थानेच आला आहात ना? शेवटी राजकीय पक्ष आहे, राजकीय पक्षात मी जेव्हा बाहेर पडणार त्याला काही ना काही अर्थ असणारच. मला नाशिकला विचारलं तुमची रणनिती काय? मग काय रणनिती सांगायाची का?"
Comments
Post a Comment