नावेद 2 नौका अपघात:जहाजाला चौकशीसाठी रत्नागिरीत बोलावून घेण्यात आले!

रत्नागिरी : 
जयगड येथील बेपत्ता झालेल्या नावेद 2 मच्छीमारी नौकेला अपघात झाल्याच्या संशायावरुन 'फत्तेहगड' या मालवाहू
जहाजाच्या कप्तानासह क्रु मेंम्बरवर गुन्हा दाखल झाला आहे.मालवाहतूकीसाठी अन्य ठिकाणी रवाना झालेल्या फत्तेहगड या
जहाजाला चौकशीसाठी पुन्हा जयगड बंदरात बोलावण्यात आले आहे. मागील महिन्यात जयगड येथील मच्छीमारी नौका बेपत्ता झाल्यानंतर खळबळ उडाली होती. त्या नौकेला मालवाहू जहाजाने धडक दिल्याचा संशय मच्छीमारांनी व्यक्त केला होता. त्यानुसार शोधही सुरु झाला; परंतु अपघातग्रस्त ठिकाणी शोध घेण्यासाठी
पाणबुड्यांचा वापर करण्यात आला नव्हता. काही दिवसांपुर्वी मच्छीमारांना नांगर आणि जाळे खोल पाण्यात सापडले. ते नावेदवरील असल्याचे चौकशीत पुढे आले आहे. जयगड पोलिसांनी दोन्ही वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. फत्तेहगड या मालवाहू जहाजाकडून समुद्रात एक वस्तू धडकल्याचा संदेश बंदर विभागाला प्राप्त झाला होता. त्यामुळे समुद्रात नावेदला अपघात झाल्याच्या
संशयाला चालना मिळाली. जाळे आणि नांगर खोल पाण्यात सापडल्याने आता पोलिसांकडून अपघाताच्यादृष्टीने तपास सुरु झाला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपअधिक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. गुन्हा दाखल झाला असला तरीही पोलिसांनी अजुनही कुणाला अटक केलेली नाही. मालवाहू जहाजाचा कप्तान, क्रु मेंबर यांचे जबाब घेण्याचे काम सुरु झाले आहे. या प्रकरणातील साक्षीदारांचीही चौकशी केली जाणार आहे. अपघात कसा झाला याचे प्रात्यक्षिक करवून घेण्यासाठी फत्तेहगड हे जहाज जयगड बंदरात बोलावून घेण्यात आले आहे.

Comments