‘खेलो इंडिया’ स्पर्धेसाठी जिल्ह्यातील 

खेळाडूंची रत्नागिरीत निवड चाचणी



दै फ्रेश न्यूज (वृत्तसंस्था)- शिवछत्रपती पुरस्कार विजेती ऐश्‍वर्या सावंत हिचा आदर्श समोर ठेवून सर्व खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवावा आणि जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ‘खेलो इंडीया’सारख्या स्पर्धा खेळताना जास्तीत जास्त खेळाडूंनी शिवछत्रपती पुरस्कार मिळवण्याचे ध्येय बाळगावे, असे प्रतिपादन युवा उद्योजक सौरभ मलुष्टे यांनी केले. या स्पर्धेत मुला व मुलींच्या 8 संघानी सहभाग नोंदवला होता. तसेच विजयी, उपविजयी आणि उत्कृष्ट खेळाडूंसाठी संगमेश्‍वर राजवाडी येथील पेम संस्थेतर्फे चषक ठेवण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगणावर जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत आयोजित ‘खेलो इंडिया’ स्पर्धेसाठीच्या जिल्हास्तरीय निवड चाचणीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी उपनगराध्यक्ष बाळू साळवी, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरावडेकर, क्रीडा अधिकारी विशाल बोडके, स्पर्धाप्रमुख विनोद मयेकर, पंकज चवंडे, पंचप्रमुख राजेश कळबंटे, शिवछत्रपती पुरस्कार विजेती ऐश्‍वर्या सावंत, प्रसाद सावंत, राजेश चव्हाण यांच्यासह विविध संघांचे प्रशिक्षक व शिक्षक उपस्थित होते.

याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष व ज्येष्ठ खेळाडू बाळू साळवी यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. जिल्हा क्रीडाधिकारी किरण बोरावडेकर यांनी खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट खेळ करतानाच विभाग, राज्य स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे आभार क्रीडा अधिकारी विशाल बोडके यांनी मानले.

 

Comments