गावठी बॉम्बस्फोटात एकाचा
मृत्यू; मुलाची प्रकृती स्थिर
दै फ्रेश न्यूज (वृत्तसंस्था)- मच्छी व जंगली जनावरे मारण्यासाठी तयार करण्यात आलेले गावठी हात बॉम्ब हाताळत असताना त्याचा मंगळवार दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वा. अचानक स्फोट होऊन यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला, तर 10 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याला अधिक औषधोपचारासाठी पनवेल येथील एम.जी.एम रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याला आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. जखमी महिलाही त्याठिकाणी औषोधोपचार घेत आहे. या दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे.
या घटनेत घटनास्थळी श्वान पथकाच्या साहाय्याने एका झाडाजवळ सापडलेले 25 गावठी हातबॉम्ब रायगड पोलिसांनी दक्षता घेत बॉम्ब शोधून नाशक पथक रायगड अलिबाग यांच्या मदतीने माणगाव तालुक्यातील निजामपूर येथील मॅगझीन (स्फोटक ठेवण्याची सुरक्षित जागा) याठिकाणी हलविण्यात आले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर या बॉम्बची विल्हेवाट लावण्यात येईल असेही पोलीस सूत्रांनी अधिक माहिती देताना सांगितले.
ही घटना माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागातील चन्नाट रस्त्यावर मशीदवाडी गावच्या हद्दीत माळरानात शेतावर धामणी नदीजवळ घडली. या घटनेची माहिती मिळताच रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांनी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली.या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की घटनेतील मयत संदेश आदिवासी चौहान (वय - 45), त्यांची पत्नी मजिनाबाई संदेश चौहान (वय -40), मुलगा सत्यम संदेश चौहान(वय -10) सर्व रा.सुरजासिंह 40 गाव बिराहली ता.रिथी जि.कठनी राज्य मध्यप्रदेश यांनी हे घटनास्थळी गावठी हात बॉम्ब मच्छिमारी व रानटी जनावरे यांची शिकार करण्यासाठी तयार करीत असत. ते माणगाव तालुक्यातील मशीदवाडी गावच्या हद्दीत धामणी नदी शेजारी शेतातील माळरानात उघड्यावर राहत होते. मंगळवार दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास यातील मृत संदेश चौहान हे शिकारीसाठी आणलेला हात बॉम्ब हाताळत असताना त्या बॉम्बचा अचानक स्फोट होऊन त्यामध्ये संदेश यांचा जागीच मृत्यू झाला. मुलगा सत्यम यास गंभीर दुखापत होऊन त्याची पत्नी माजीनाबाई हिला किरकोळ दुखापत झाली.
Comments
Post a Comment