दै फ्रेश न्यूज (वृत्तसंस्था)- राज्यात गेले काही दिवस सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप आता मिटणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथे दोन मॅरेथॉन बैठका झाल्या. या बैठकीला परिवहन मंत्री अनिल परब, प्रशासनातील अधिकारी, एसटी कर्मचारी संघटनांचे प्रतिनधी तसंच आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत सहभागी झाले होते. यावेळी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्याचा निर्णय झाला मात्र तरी देखील एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत.
दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब यांना कर्मचाऱ्यांना उद्या कामावर येण्याचे आवाहन केले आहे. तसेच न्यायालयाने गठीत केलेल्या समीतीने विलीनीकरणाचे आदेश दिले तर ते आम्ही मान्य करु असेही अनिल परब म्हणाले. तसेच संपामुळे एसटीची परीस्थिती अतिशय वाईट झाली आहे. ज्या कर्मचाऱ्यांना आम्ही दिलेला निर्णय मान्य असेल ते कामावर येतील. ज्यांना मान्य नसेल, जे संपात राहतील त्यांना कडक कारवाईला सामोरे जावं लागेल, असा इशारा देखील परब यांनी दिला आहे.
अनिल परब म्हणाले, “काल सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. विलीनीकरणाच्या बाबतीत देखील सरकारने भूमिका मांडली. मागण्या मान्य झाल्यानंतर लढाई थांबवायची असते. मात्र काही कर्मचारी कामावर येण्यास तयार आहेत. जे कर्मचारी गावात आहेत त्यांनी आज कामावर यावे आणि जे मुंबईत आलेले आहेत त्यांनी उद्यापर्यंत कामावर यावं. आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत किती कामगार कामावर आले कीती नाही, या गोष्टींचा अभ्यास करु, त्यानंतर महामंडळ पुढील निर्णय घेईल. जे कामगार विलीनीकरणावर ठाम आहेत. त्यांना मला सांगायच आहे मी वारंवार सांगत आहे ही मागणी हायकोर्टाने नेमलेल्या समितीसमोर आहे. त्याला 12 आठवड्याचा कालावधी दिलेला आहे. त्यामुळे 12 आठवडे संप करणे हे परवडणार नाही. आर्थिक परिस्थिती वाईट असताना देखील सरकारने निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा.”

Comments
Post a Comment