*स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव विशेष लेखमाला*
*स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव विशेष लेखमाला*
लेख क्रमांक 01
*आरोग्यसंपन्न भारतासाठी... !*
आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळी असणारी स्थिती तसेच त्यावेळी असणारी आव्हाने यात कालानुरुप बदल झालेला आपणास दिसतो. आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना भविष्याचा वेध घेतानाच आतापर्यंत काय घडलय याकडे देखील लक्ष द्यावं लागेल. त्यात देशाचे नेतृत्व जी पिढी आगामी काळात करणार आहे त्या युवापिढी समोर हा आलेख मांडला जाणं आवश्यक ठरतं..
आपण गेल्या दीड वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून कोविडच्या संकटाचा मुकाबला करित आहोत. या कोविडच्या संकटाने युवा पिढीच नव्हे तर सर्वांच्याच आरोग्य संपन्नतेचे महत्व अधोरेखित केले आहे. असे असले तरी यात युवा पिढीकडे अधिक लक्ष आपणास द्यावे लागणार आहे.
आरोग्य म्हणजे केवळ शरीर सौष्ठव अशी संकल्पना अनेक जण बाळगून असतात. शरीर सौष्ठवावर लक्ष केंद्रीत न करता एकूण आरोग्याकडे आपण लक्ष देण्याची गरज आहे. जगाच्या तुलनेत आपल्या देशातील बहुसंख्य युवक यात आघाडीवर आहेत हे कोविड काळात स्पष्ट झाले आहे.
जगात दुसरी, तिसरी आणि चौथी लाट असा प्रसार हात असतात. भारतातील कोविडची स्थिती नियंत्रणात आहे. लोकसंख्येच्या बाबतीत आपला देश चीन नंतर जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे मात्र कोविड काळात याचा आपणास कदाचित फायदा झाला असे म्हणता येईल. कोविडच्या विषाणूचा मुकाबला करताना आपल्याकडे केवळ युवा पिढीच नव्हे तर संपूर्ण देशात सर्व वयोगटात आरोग्य स्थिती उत्तमच असल्याचे दिसून आले. यात हर्ड इम्युनिटी प्रकारात अधिक आघाडी आपण घेतली आहे.
आपल्या देशात असणाऱ्या अन्नसेवन आणि अन्नपदार्थ बनविण्याच्या पध्दतीमुळे आपल्या सर्वांची रोगप्रतिकार क्षमता उत्तम आहे. यात बदल होवू नये यासाठी आपण काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक ठरते.
ग्रामीण भागात काही प्रमाणात मर्यादीत असली तरी जंकफूडची सवय आहे. शहरी भागात आज नवी पिढी याच्यामागे धावताना दिसते. आरोग्यासाठी याचा वापर नको असे सांगितले असले तरी शहरी भागात मैदामिश्रीत पिझ्झा तसेच पावाचे पदार्थ सोबतच चायनीजही फॅड नव्या पिढीच्या डोक्यात आहे.
एका बाजूला या पिढीचा अधिक काळ हा मोबाईल फोन बघण्यात जातोय तर दुसऱ्या बाजुला हे जंक फूड आणि शितपेयांचं वेड यामुळे एक पिढी पोटॅटो काऊच होते की काय असा प्रश्न समोर येतो. नव्या पिढीत उत्साह दिसला तरी स्थुलता सर्वप्रथम जाणवते . मैदानी खेळांचा आभाव त्यात खानपानाच्या चुकीच्या सवयी यामुळे हा स्थुलतेचा (ओबेसिटी) प्रकार वाढत आहे. वैद्यकीय संशोधनाने मानवाची आयुमर्यादा वाढवली हे बरं असलं तरी त्या वयापर्यंत पोहचायचं असेल तर किमान काही पथ्ये पाळणं आणि जीवन शैलीत बदल करणं ही आता काळाची गरज बनली आहे.
प्रशांत दैठणकर
Comments
Post a Comment