वांद्री (संगमेश्वर) तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईचे आदेश
दै फ्रेश न्यूज (वृत्तसंस्था)- तालुक्यातील वांद्री ग्रामपंचायतीमधील तत्कालीन सरपंच सुभाष धोंडू सालीम व ग्रामसेवक रोशन अनंत जाधव यांनी 2016 - 17 व 2017-18 या काळात 14 वा वित्त आयोग मधून तसेच ग्राम निधीमधून संगनमताने परस्पर बेकायदेशीरपणे पैसे लंपास करून केलेल्या एकूण रक्कम रुपये आठ लाख 42 हजार 740 इतक्या रकमेचा टक्का लेखापरीक्षण अहवालात ठेवण्यात आला होता.
सदर प्रकरणी गटविकास अधिकारी देवरुख यांनी नेमलेल्या चौकशी समितीने तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांना संयुक्तपणे दोषी ठरवून सदर रकमेच्या वसुलीचे आदेश देण्यात आले होते. यासोबतच ग्रामपंचायत अधिनियम च्या तरतुदीनुसार दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश असताना संबंधित विभागाकडून टाळाटाळ करण्यात येत होती.
ही बाब ग्रामस्थांकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 23 नोव्हेंबर 2021 रोजी संबंधित दोषींवर योग्य ती कारवाई करावी असे आदेश गटविकास अधिकारी देवरुख यांना दिले आहेत. याबाबत गटविकास अधिकारी काय कारवाई करणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment