पोलिसांच्या प्रतिमेबद्दल गृहमंत्र्यांना चिंता ; पोलीस महासंचालक कार्यालयात आढावा बैठक

पोलिसांच्या प्रतिमेबद्दल गृहमंत्र्यांना चिंता ; पोलीस महासंचालक कार्यालयात आढावा बैठक
मुंबई : अलीकडच्या काळात घडणाऱ्या घटनांमुळे पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पोलिसांची प्रतिमा डागाळल्याबद्दल गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी चिंता व्यक्त केली असून पोलिसांची प्रतिमा सुधारण्यासाठी पोलिसांनाच सामूहिक प्रयत्न करण्याचा आदेश त्यांनी मंगळवारी दिला.
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस महासंचालक कार्यालयात आढावा बैठक आज घेण्यात आली. मुंबई शहर व राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा तसेच महिला अत्याचाराच्या गुन्ह्य़ांचा सविस्तर आढावा गृहमंत्र्यांनी या वेळी घेतला. सर्वसामान्य जनतेच्या मनात पोलिसांची चांगली प्रतिमा निर्माण करणे, तसेच यंत्रणेबद्दल विश्वास निर्माण करणे, ही आपल्या सर्वाची जबाबदारी आहे. यासाठी राज्यातील पोलीस यंत्रणांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
छोटय़ा स्वरूपाच्या तक्रारींचीही तत्काळ दखल घेऊन योग्य ती कार्यवाही केल्यास जनतेच्या मनात पोलिसांबद्दलचा विश्वास वाढेल. त्यातूनच मोठय़ा स्वरूपाचे गुन्हे टाळता येणे शक्य होईल. यासाठी प्रत्येक कर्मचारी आणि अधिकाऱ्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची, असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोणत्याही घटनेचा तपास, गुन्हा नोंद अथवा अन्य आनुषंगिक कार्यवाही व कारवाई विहित मुदतीत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिल्या.
पोलिसांनी सायबर सुरक्षेसाठी नवनवीन प्रयोग, संशोधन आणि गुन्हे उकल करण्याच्या विविध पद्धतींचा वापर करावा, अशी सूचना त्यांनी केली.
राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांचाही आढावा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या वेळी घेतला. एकूण गुन्ह्य़ांचे स्वरूप आणि माहिती घेतली असता परिचित व्यक्तींकडूनच गुन्हे घडल्याचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास येत आहे. पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यास आलेल्या महिलेची तक्रार तत्काळ नोंदवून घ्यावी, तिला दिलासा द्यावा, तक्रारीची गांभीर्याने दखल घेत जलदगतीने तपास पूर्ण करून संबंधित महिलेस न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगत दक्षता समित्या नव्याने कार्यान्वित करण्यास त्यांनी सांगितले.
संयुक्त कारवाई गरजेची
अवैध दारू विक्री रोखण्यासाठी पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकत्रित कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी तसेच ग्रामीण भागातील वाढत्या अमली पदार्थाच्या सेवन व दळणवळणावर लक्ष केंद्रित करून अन्न व औषध प्रशासन विभागासोबत संयुक्तपणे कारवाई करण्यास त्यांनी सांगितले.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा