शब्द लहरी

 

      

 शब्द लहरी 


 निसर्ग

निसर्गाने आपल्याला सुंदर हिरवळ दिली आहे. निसर्गाने आपल्याला प्राणवायू दिला आहे. हा प्राणवायू आपल्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे.ऑक्सिजन या प्राणवायू शिवाय आपण फक्त काही क्षण जीवंत राहू शकतो. मनुष्याला कार्य करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते आणि ही ऊर्जा त्याला अन्नातून प्राप्त होते, व हे अन्न देखील निसर्गच उपलब्ध करून देतो. आपल्याला राहण्यासाठी जमीन निसर्गाने दिली आहे. या धरतीवर बनवलेले घर सुद्धा निसर्गात उपलब्ध झालेल्या वस्तूं पासून बनवण्यात आले आहे. 

सौ.प्रतिमा अरुण काळे
निगडी प्राधिकरण पुणे,४४
----------------------------------------------

 विचारधारा

प्रत्येकांच्या जीवनामध्ये सुख, दुःख येतात.  आणि काही दिवसांनी परत निघून जातात. पण,अशा वेळी, एखाद्याच्या जीवनामध्ये खूप दुःख आलेले आपल्याला कळले असेल तर.. गप्प न, बसता माणुसकीच्या नात्याने त्याला,थोडासा तरी धीर, देण्यासाठी ,तू,एकटा नाहीस तर..आम्ही सर्वजण तुझ्या सोबतीला आहोत. तू, काळजी करू नकोस, लवकरच सर्व  ठीक, होईल...असे, जर.. ,महान शब्द आपुलकीने बोलले तर... तो, व्यक्ती,पुन्हा एकदा नव्याने जगायला लागेल...  

सौ. संगीता संतोष ठलाल
मु. कुरखेडा जि. गडचिरोली
------------------------------------------------

ज्ञानेश्वरीतील   सुंदर  प्रतिमाने

          जो  आपुलेनि  नागरपणे  ।  इंद्रभुवनाते  पाबळे  म्हणे । तो  केवी  रंजे
पालिविणे  ।  भिल्लाचेनि  ।।.

            जो  अम्रुतासि  ठी  ठेवी  । तो  जैसा  कांजी  न  सेवी  ।  तैसा  स्वसुख़ानुभवी ।   न  भोगी   ऋद्धी ।।

              पार्था  नवल  ते  पाही  । जेथ
स्वर्ग सुख  लेखनिय  नाही । तेथ  ऋद्विसिद्धी   कायी । प्राकृता  होती  .


            जो  आपल्या  ऐश्वर्या पुढे  (घराच्या    सौंदर्यापुढे ) इंद्र  भुवनाला
सुद्धा  तुच्छ  मानतो.  त्याला  भिल्लाच्या
पाल्याच्या  झोपड्यापासून  ( पर्णकुटीत )
कसे  समाधान  होणार  ?

         अरे  जो  अम्रुताला  देखील  नावे
ठेवतो . किंवा  अम्रुत  से्वनात   स्थिर 
समाधानी  असतो तो  जसा  कांजी  पेज
पीत  नाही . तसा  आत्मानंदाचा  अनुभव
घेणारा  पुरूष  शुद्र , ऐहिक  ऐश्वर्याचा  
उपभोग  घेत  नाही .

       अर्जुना  हा  काय  चमत्कार  आहे  पहा  , ज्या  पुरूषाला  स्वर्ग  सुखाची  पर्वा  , मोजदाद  नाही .त्याला  क्षुल्लक
सामान्य  ऋद्विसिद्धी ची   काय  किंमत?

सौ.  शैलजा  जाधव (पाटील)
           चांदवड   नासिक
--------------------------

विषय.."साक्षीदार" ... 
लघु कथा .

रावडी गावांमध्ये बयो आणि बाज्या हे मोल मजुरी करून राहत होते. 
तसे स्वभावाने गरीब होते. त्यांना एक रखमा नावाची लहान मुलगी होती. 
बयो काही ठिकाणी धुणीभांडी करायला जात असे. 
असेच एकदा ती तिच्या नेहमीच्या शेठजीण बाईकडे कामाला आपल्या बरोबर तीच्या मुलीला देखील घेऊन गेली. तिथे त्या शेठजीण बाईची लहान मुले खेळत होती.त्यात रखमा मिसळून खेळायला लागली. 
खुप सुंदर वाटले तिथे तीला खेळायला. त्यातच बाईसाहेब यांनी तीला खाऊ देखील दिला .त्यामुळे ती खूपच खुश झाली. सकाळी आल्यापासून ती तिथे खेळत होती, ते घर तिच्या परिचयाचे झाले होते. त्यादिवशी ती आपल्या आई बरोबर परत घरी आली. पण मनातून परत आपण या घरी खेळायला यायचे हे तिने ठरवले. 
      बयो रोजच कामाला तिथे जात होती. एकदा पुन्हा न रहावून 
रखमाने  बयो बरोबर त्या शेठजींच्या घरी कामाला जाताना; मी येणार असा हट्ट धरला ,  लहान मुलींचा हट्ट त्यामुळे बयो तीला घेऊन आली. 
रखमा जाऊन खेळायला गेली.खेळता खेळता तिचे लक्ष तिथे असणार्‍या छोट्या बाहुली कडे गेले. ती बाहुली तिला खूप आवडली. तीने ती घेतली आणि लपवून ठेवली.
बयो चे सगळे काम संपल्यावर ती व रखमा घरी जायला निघाली. तेव्हा रखमा ने ती लपवलेली बाहुली पटकन घेतली आणि आई च्या पाठोपाठ घरी निघाली. 
संध्याकाळी  घरी येऊन घरच्या स्वैपाक करण्यात बयो गुंतली.
 रखमा कडे तिचे लक्ष नव्हते. रखमा बाहेर अंगणात त्या बाहुली बरोबर खेळत होती. तिच्याशी बोलत होती. की, मी देखील तुझ्या सोनू ताई सारखी खूप मोठी होईन , खूप शिकेन. असा तुझ्या सारखाच मग सुंदर  फ्रॉक मला घालायला मिळेल. 
ते शब्द बयो च्या कानावर पडले म्हणुन ती बाहेर आली. तर तीने आपल्या मुलीला बाहुलीशी बोलताना पाहिले. तीने रखमेला आपल्या जवळ बोलावले आणि ही बाहुली कुठून आणली ते विचारले. तीने देखील त्या शेठजींच्या मुलीची सोनूची घेऊन आले असे सांगितले. 
तीने तुला खेळायला दिली का???
बयो ने प्रश्न विचारला. 
छ्या!! अग तिथे कोणीच नव्हते, तेव्हा ती लपवली. आपण निघालो तेव्हा गुपचूप आणली. "कोणीच पाहिले नाही मला बाहुली चोरताना" असे रखमा बयोला म्हणाली. 
बयोला तीचा खुप राग आला, तीने चोरी केली होती. तीने जोरात रखमाला मारले. 
ती म्हणाली की ,तुला कोणीच पाहिले नाही .अग पण, आपला हात वर आकाशाकडे करत म्हणाली की! हा वर नियंता बसला आहे ना! त्याने तुला चोरी करताना पाहिले आहे. 
तो 'साक्षीदार' आहे. 
आपण कसे वागतो , काय करतो आपली चूक, बरोबर हे सर्व तो जगाचा नियंता बघत असतो आणि त्यानुसार आपल्याला आयुष्यात भोगावे लागते. त्यामुळे हे नेहमीच लक्षात ठेव.चोरी करायची नाही; नेहमीच कष्टाने करून एखादी गोष्टी मिळवायची , कारण या सर्वाला आपल्याकडे कोणी पहात नसले तरी "देव" हा पहात असतो तो "साक्षीदार" असतो. आपल्या कर्माचा हिशोब त्याच्याकडे नेहमीच मांडला जातो. 
उद्या सोनूकडे जाऊन ,तिला तिची बाहुली देऊन टाक. आपण तुला बा कडे पैसे आले की, दिवाळीत अशीच छान बाहुली घेऊ. .. रखमा खुदकन हसली,आणि आईला बिलगली. 
 सौ मधुरा कर्वे. ( भावगंधा )
पुणे.

Comments