नवोदित लेखकांचा कथासंग्रह ' झोका कथास्तु '.
पुस्तक परीक्षण- नवोदित लेखकांचा कथासंग्रह ' झोका कथास्तु '.
- रवींद्र जांभळे.
'झोका कथास्तु ' या कथासंग्रहात एकूण बावीस कथा समाविष्ट आहेत. या कथा कोणी एका लेखकाने लिहिलेल्या नसून, त्यात राज्यस्तरीय स्पर्धेतील विजेत्यांसह इतर सहभागी स्पर्धकांच्या दर्जेदार कथाही समाविष्ट आहेत. त्यामुळेच या कथासंग्रहातील कथांच्या विषयांमध्ये वैविध्य दिसते. नवोदित लेखकांचा कथासंग्रह प्रसिद्ध करण्याचे धाडस झोका इनफॉटेनमेंट यांनी दाखवले, त्याबद्दल त्यांचे कौतुकच केले पाहिजे. कथासंग्रहाला खासदार डॉक्टर अमोल कोल्हे व पानिपतकार श्री. विश्वास पाटील यांचे अभिप्राय लाभले आहेत. ' चांगभलं ' संतोष पाटील, कोल्हापूर ' ढोलकीच्या तालावर' बाळासाहेब भडकवाड, पुणे ' ईश्वर आणि चार आत्मे ' राहुल शिंदे, सांगली ' पाऊस पाणी ' रोशनकुमार पिलेवान, चंद्रपूर ' सन १९९६ कांडोमसची गोष्ट ' आनंद प्रधान, मुंबई ' जड झालेला रुपया ' विशाल पोतदार, सातारा अशा २२ लेखकांच्या कथा या संग्रहात समाविष्ट आहेत. ' झोका ' ही कथासंग्रहाचे शीर्षक असलेली कथा अण्णाप्पा पाटील , कोल्हापूर यांनी लिहिलेली आहे. ही कथा काळजाचा ठाव घेणारी आहे. शेतकऱ्याची व्यथा या कथेत मांडली आहे गळफास घेणाऱ्या दोरीचे रूपांतर झोक्यात कसे होते हे या कथेत सांगितले आहे. कथेच्या शेवटी झोका या विषयावर कविताही लेखकाने लिहिली आहे. ' वारसा ' ही कथा मेघना सावंत , सिंधुदुर्ग येथील लेखिकेने लिहिलीआहे. प्रेमभंगातून आत्महत्येकडे वळलेल्या सुजाताला जनाई ही अडाणी स्त्री 'धाडस जगण्यासाठी लागते, मरण्यासाठी नाय' असा उपदेश करून, तिला आत्महत्या करण्यापासून कसे परावृत्त करते हे या कथेत सांगितले आहे. 'डबल गेम ' या रोशन पिलेवार, चंद्रपूर यांच्या कथेत व्यभिचारी बायकोची कथा सांगितली आहे. ' उतारा ' या अश्विनी भरकट, कोल्हापूर यांच्या कथेचा विषय अंधश्रद्धेवर आधारलेला आहे. 'अधुरी एक काहणी ' ही सुचित्रा पवार, सांगली यांची कथा विश्वासघात या विषयावर आहे. ' वन्स मोर नाही ' ही वर्षा तावडे, कोल्हापूर यांची कथा निराश मनाला उभारी देणारी आहे. प्रत्येक लेखकाच्या, लेखिकेच्या कथेच्या नावाखाली लेखकाचे, लेखिकेचे नाव व ठिकाण देणे आवश्यक होते. नवोदित लेखकांनी लिहिलेल्या या कथा आहेत, तरी ओघवत्या शैलीतील या कथा वाचकांना खिळवून ठेवतात. पुस्तकाची मांडणी चांगली आहे. शुभ्र कागद, मोठा फॉन्ट वापरला आहे. त्यामुळे कथा वाचताना आनंद मिळतो. प्रत्येकाने आवर्जून वाचावा असा हा कथासंग्रह आहे. पुस्तकाचे नाव : झोका कथास्तु. प्रकाशक : श्री. दशरथ आप्पा पाटील, झोका इनफॉटेनमेंट. पृष्ठे : २७७. मूल्य : रुपये २५०/- - रवींद्र जांभळे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा