गरबा, दांडियाचे पोशाख विक्रीविना पडून

 

गरबा, दांडियाचे पोशाख विक्रीविना पडून

निर्बंधांमुळे सलग दुसऱ्या वर्षी मागणी नाही; हंगामी विक्रेते परतले

 गरबा आणि दांडियाच्या पोशाखांनी सजलेली बाजारपेठ यंदा ओस पडली आहे. राज्य शासनाने नवरात्रीत गरबा आणि दांडिया यावर बंदी घातल्याने या पोशाखांना मागणी नाही. त्यामुळे दरवर्षी गुजरातहून येणारे विक्रेते निराशेने परतले आहेत. बराच साठा शिल्लक राहिल्याने मुंबईतील विक्रेतेही चिंतेत आहेत.

करोनाकहर काहीसा आटोक्यात आल्याने यंदा नवरात्र उत्सव पूर्ववत होईल या आशेने गरब्याच्या पोशाख विक्रेत्यांनी जोरदार तयारी केली होती. गेल्या वर्षीच्या बंदीनंतर यंदा प्रतिसाद चांगला मिळेल म्हणून नवनवीन नक्षीचे पोशाखही तयार करून घेण्यात आले; परंतु करोना संसर्ग वाढू नये या उद्देशाने उत्सवाच्या काही दिवस आधी गरबा आणि दांडियावर बंदी घालण्यात आल्याने या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे.

या पोशाखांची विक्री करण्यासाठी दरवर्षी काही मंडळी सुरत, अहमदाबाद या भागांतून मुंबईला येतात. अंधेरी, बोरिवली, दादर अशा मोठ्या बाजाराच्या ठिकाणी ठेले मांडून ते व्यवसाय करतात. यंदाही हे हंगामी विक्रेते मुंबईत आले, परंतु मागणीच नसल्याने अनेकांनी काही दिवसांत गाव गाठला.

‘‘नवरात्रीच्या आठ ते दहा दिवस अगोदर आम्ही मुंबईत येतो. गेल्या वर्षी येऊ शकलो नाही. यंदा व्यवसाय होईल अशी आशा होती; परंतु दहा दिवसांत        केवळ बोटावर मोजण्याइतके ग्राहक आले आहेत. आता दोन दिवसांत आम्हीही परत जाऊ,’’ अशी प्रतिक्रिया सुरतहून दादर बाजारपेठेत      आलेल्या भावेश यांनी दिली.

‘‘करोना नव्हता तेव्हा दर दिवशी १०० हून अधिक कपड्यांची विक्री व्हायची आणि भाड्यानेही दिले जायचे. या वेळी दिवसाला १० कपडे विकले जाणेही मुश्कील झाले आहे. लहान मुलांसाठी किरकोळ मागण्या येतात, परंतु मोठ्या वयोगटातील पोशाख मागणीवाचून पडून आहेत,’’ असे मालाड येथील गायत्री ड्रेसचे भरत नायक यांनी सांगितले.

गेल्या वर्षी परिस्थिती गंभीर असल्याने झालेले नुकसान आम्ही समजू शकतो; पण यंदा मात्र व्यवसाय पूर्णत: पाण्यात गेला. नवरात्र हा आमच्यासाठी महत्त्वाचा हंगाम असल्याने त्याची तयारी वर्षभर सुरू असते. कपडे शिवून घेणे, त्यावर नक्षी करणे, छपाई करणे यात बरीच मेहनत आणि पैसे खर्च झाले. – कमल नंदानी, व्यापारी, बोरिवली

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या

news.mangocity.org