रत्नागिरी शहरातील रस्ते खोदाई दिवाळी उत्सव काळात थांबवण्यात यावी: कॉंग्रेस शहर अध्यक्ष राकेश चव्हाण यांची मागणी
रत्नागिरी : दिवाळी अवघ्या चार दिवसांवर आली तरी या ना त्या कारणाने रत्नागिरी शहरातील रस्त्यांची खोदाई सुरूच आहे. दिवाळी सणामध्ये तरी रत्नागिरी नगर परिषदेने शहरवासीयांच्या संयमाचा अंत पाहू नये. शहरात सुरू असलेले रस्त्यांचे खोदकाम तातडीने थांबवावे आणि खोदलेल्या रस्त्यांचे योग्यरीत्या सपाटीकरण करावे, म्हणजे दिवाळी सणामध्ये शहरात खरेदीसाठी जाणे नागरिकांना शक्य होईल. रस्ते खोदाई सणाच्या काळात थांबवावी अशा सूचना मंत्री आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी नगर परिषदेला द्याव्यात, अशी मागणी रत्नागिरी शहर काँग्रेसचे अध्यक्ष राकेश चव्हाण यांनी प्रसाध्यामांशी बोलताना केली असून तसे पत्रही मंत्री सामंत यांना देणार असल्याचे सांगितले.
रत्नागिरी शहरातील नागरिक आणि विविध कामांसाठी जिल्ह्यातून रत्नागिरीत येणारे नागरिक यांची रत्नागिरी शहरात सुरू असलेल्या रस्ते खोदाई मुळे खुप मोठी पंचाईत होत आहे. अनेक अडथळ्यांना त्यांना सामोरे जावे लागत आहे. दिवाळी चार दिवसांवर आल्याने रत्नागिरीकर नागरिकांची दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे. मात्र रस्त्यांच्या खोदाईमुळे नको ते शॉपिंग असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. त्यामुळे दिवाळीसाठी तुमचे डांबरीकरण नाही झाले तरी चालेल परंतु जेसीबीच्या साहाय्याने खड्डे भरून सपाटीकरण तरी करावे आणि दिवाळीत खोदाई बंद करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेस शहर अध्यक्ष राकेश चव्हाण यांनी केली आहे.
रस्ते खोदल्याने जेथे पार्किंग सुविधा होती त्या जागी वाहने पार्क करणेही अशक्य झाले आहे. आठवडा बाजार, तेली आली नाका, मारुती मंदिर रोड याठिकाणी खोदाईमुळे वाहने उभी करण्यास जागाच नाही. वाहतूक कोंडीची समस्या सातत्याने निर्माण होत असून कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांना कसरत करावी लागत आहे, त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर उदय सामंत हे येथील मंत्री, आमदार आणि स्थानिक म्हणून त्यांना जनतेच्या या समस्येची नक्कीच जाणीव आहे. रत्नागिरी नगर परिषदेतही त्यांच्याच पक्षाची सत्ता आहे. त्यामुळे तेच याबाबत रत्नागिरी नगर परिषदेला सूचना देऊ शकतात. त्यांनी दिवाळी पुरते रस्ते खोदकाम थांबविण्याच्या सूचना नगर परिषदेला द्याव्यात, असे चव्हाण म्हणाले.
*व्यापारीही अडचणीत*
रत्नागिरीत रस्ते खोदाईमुळे वाहने हाकणे अवघड झाले असून वाहने पार्किंग करण्यातही अडथळे येत असल्याने ग्राहक खरेदीसाठी येणे टाळत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्या व्यापारावर परिणाम होत आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरा साठी रस्ते खोदणे थांबवावेत आणि खडलेले रस्ते बुजवून सपाटीकरण करावे, अशी व्यापारी वर्गाचीही मागणी आहे. अशी माहीती राकेश चव्हाण यांनी दिली.
Comments
Post a Comment