‘एअर इंडिया’च्या १६,००० कोटींच्या थकबाकीचे दायित्व सरकारवर; टाटांकडे मालकी देण्यापूर्वी केंद्राकडून कर्जभाराचेही हस्तांतरण

‘एअर इंडिया’च्या १६,००० कोटींच्या थकबाकीचे दायित्व सरकारवर; टाटांकडे मालकी देण्यापूर्वी केंद्राकडून कर्जभाराचेही हस्तांतरण
टाटांकडे मालकी देण्यापूर्वी केंद्राकडून कर्जभाराचेही हस्तांतरण
नवी दिल्ली : टाटा समूहाला मालकी सोपविली जाण्यापूर्वी, ‘एअर इंडिया’ने थकविलेली सुमारे १६,००० कोटींची देणी ही संपूर्णपणे भारत सरकारकडून विशेष हेतूने स्थापित कंपनी ‘एअर इंडिया अॅसेट होल्डिंग लिमिटेड (एआयएएचएल)’कडे हस्तांतरित केली जाणार आहेत, असे केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी स्पष्ट केले. सरलेल्या शुक्रवारी १८,००० कोटी रुपयांच्या बोलीवर टाटा सन्सने ही तोटय़ातील हवाई वाहतूक कंपनी हस्तगत केली आहे.
इंधन पुरवठादारांची थकविलेली आणि इतर प्रलंबित देयकांपोटी सुमारे १६,००० कोटी रुपये ‘एअर इंडिया’ने थकविले आहेत. या रकमेच्या दायित्वासह ‘एअर इंडिया’वरील ७५ टक्के कर्ज भारही ‘एआयएएचएल’ ही कंपनी उचलणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयातील निर्गुतवणूक विभाग म्हणजेच ‘दिपम’चे सचिव तुहिन कांता पांडे यांनी सोमवारी दिली.
टाटा समूहाकडे ‘एअर इंडिया’ सुपूर्द करण्यापूर्वी केंद्र सरकार सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांच्या कालावधीसाठी ‘एअर इंडिया’च्या ताळेबंद पत्रकाची पुन्हा चाचपणी केली जाईल आणि या दरम्यान जे दायित्व आणि देणी असतील ती ‘एआयएएचएल’कडे हस्तांतरित केली जातील. तथापि, डिसेंबपर्यंत थकबाकीमध्ये फारशी वाढ होण्याची शक्यता नाही. कारण एअर इंडियाला तोवर कामकाजासाठी सरकारकडून दररोज २० कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे, असेही पांडे यांनी स्पष्ट केले.
उपलब्ध तपशिलानुसार, ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत ‘एअर इंडिया’वर एकूण ६१,५६२ कोटी रुपयांचे कर्ज थकीत होते. यातील टाटा सन्सची होल्डिंग कंपनी ‘टॅलेस प्रायव्हेट लिमिटेड’ १५,३०० कोटी रुपये देईल आणि उर्वरित ४६,२६२ कोटी रुपये ‘एआयएएचएल’कडे हस्तांतरित केले जातील.
तथापि विशेष हेतूने रचित कंपनी ‘एआयएएचएल’कडे एअर इंडियाच्या १४,७१८ कोटी रुपयांचे मूल्यांकन असलेल्या जमीन आणि इमारतीसह इतर काही मालमत्ता हस्तांतरित केल्या जाणार आहेत. केंद्र सरकारने २००९-१० पासून, आतापर्यंत कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या ‘एअर इंडिया’मध्ये १.१० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यामध्ये ५४,५८४ कोटी रुपये रोख साहाय्य आणि ५५,६९२ कोटी रुपये कर्ज हमी देण्यात आली आहे.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा