शब्द लहरी

 

      

 शब्द लहरी

------------------------
    निसर्ग

मानवाला आपल्या जीवनातील झाडांचे महत्व कळत नाही. वृक्षांची लागवड करणाऱ्या लोकांना शासनाने प्रोत्साहन दिले पाहिजे आणि या पवित्र कार्यात त्यांना आर्थिक सहाय्य दिले पाहिजे. वृक्षारोपणाच्या कार्याचा वीस सूत्री कार्यक्रमात समावेश केला पाहिजे. जनतेच्या पाठबळाद्वारे हा कार्यक्रम यशस्वी करण्याचे ध्येय असले पाहिजे. तेव्हाच ‘झाडे लावा देश वाचवा’ ची घोषणा प्रत्यक्षात साध्य होऊ शकेल शकेल. मानवी जीवनात झाडांचे महत्व अतुलनीय आहे, झाडांशिवाय आपण मानवी जीवनाची आणि निसर्गाची कल्पनाही करू शकत नाही. म्हणूनच या निसर्गाला वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन एकमेकांना सहाय्य करून वृक्षारोपण केले पाहिजे.आज,विजयादशमीला आपट्याच्या झाडाची पाने,फांद्या न तोडता आपण दसरा साजरा करूया.आपल्या वाईट सवयींवर आपणच विजय मिळविला पाहिजे.उलट आज प्रत्येकाने एक  झाड लावून दसरा साजरा करावा.

सौ.प्रतिमा अरुण काळे
निगडी प्राधिकरण पुणे,४४
-------------------------------
दसरा...

दसरा... म्हणजे शुभ दिवस... त्यामुळे आजचा रंग जांभळा.. खरोखर the color of rich कुठल्या रंगला म्हणत असतील तर तो हाच रंग... समृद्धीचा.. सौंदर्याचा... आणि लोभसतेचा... या रंगाकडे पाहिल्यावरच एक वेगळी सुंदर भावना मनामध्ये येते.. निसर्गाचा अविष्कार म्हणा किंवा अजून काही हा रंग हिरव्यागार पानांमध्ये दिसला तर तो नाजाराच लोभसवाणा असतो... सप्टेंबर महिन्यात फुलणारे कातळ साडे याचीच तर साक्ष देतात... निरनिराळी फुले, पाने, कीटक यांनी सगळा सडा फुलून जातो.. जांभळ्या रंगांची सीतेची असावे तर विशेष लक्ष वेधून घेतात.. आता या फुलांना सीतेची आसवे का म्हणतात हे मला माहिती नाही.. पण त्यांना बघितले तर डोळ्यातून नुकतेच ओघळायला आलेल्या अश्रू थेंब असावेत असेच भासते... आणि सड्यावर चौफेर विखुरलेली असताना तर सगळा सडाच जांभळ्या रंगाने पांघरलेला असा दिसतो... 

आज दसरा.. विजयादशमी .. आजच देवांनी असुरांवर युद्ध करून विजयश्री खेचून आणली... तो आजचा दिवस म्हणून आनंदाचा आणि भाग्याचा... आजच्या दिवशी आपली कामाची आयुधे पूजतात.. सरस्वती पूजन होते.. गोडा धोडाचा नैवेद्य होतो.. संध्याकाळी आपट्याची पाने आजच्या दिवशी सोन्याचे प्रतिक म्हणून वाटली जातात... सगळे आप्तेष्ट मित्र मंडळी एकमेकांना भेटतात, शुभेच्छा देतात.. काहीतरी नवीन गोष्टीची खरेदी होते.. कोणी त्यांच्या नवीन वाटचालीस सुरुवात करतो... सगळे शुभ कार्यात आणि आनंदात हा सण साजरा करतात... आजच्याच दिवशी बऱ्याच ठिकाणी रावणाचे दहन करतात आणि आनंदोत्सव साजरा करतात..

प्रतीकात्मक केलेलं हे दहन खरंच आपण मनापासून करतो का? हा प्रश्न मला नेहमी पडतो... की फक्त आनंदोत्सव साजरा करता यावा आणि एकत्र येऊन मौज मजा करावी हाच एक उद्देश त्यामागे असतो... हिंदू धर्मातील प्रत्येक सणांना काही ना काही खोल अर्थ आहेत.. विज्ञानाशी निगडीत ते आहेतच तरीही मानवी मनाशी त्याचा थेट संबंध येतो... हा संबंध आपण नक्की प्रस्थापित करतो का? रावण दहन हे खरंतर नुसते रावणाचे प्रतीकात्मक दहन नसून त्यातून खरंच एक संदेश घेण्यासारखा असतो... रावण दहन करताना खरंतर ते एक प्रतीकात्मक दहन असते आपल्यामधील क्रोधाचे, लोभाचे, इर्श्येचे, द्वेषाचे, निराशेचे, संशयाचे, मोहाचे, आळसाचे, गर्वाचे आणि असहाय्यातेचे.... हे जेव्हा आपण ओळखायला शिकू तेव्हाच आपण आपल्या सगळ्या रूढी आणि परंपरा जगू... खूप सुंदर आहे आपला धर्म.. आपल्याला फक्त तो पाळता आला पाहिजे एवढच... 

सिद्धेश विजय वैद्य 
---------------------------------
विजयादशमीचे सार        

         "सोने घ्या सोन्यासारखे राहा", असे म्हणणारे आपण सारे लोक वर्षभर आपल्यातील काही वादामुळे, भांडणामुळे किंवा रोजच्या व्यस्त कामामुळे एकमेकांना पारखे झालेलो असतो. परंतु या दसरा नावाच्या सणाच्या निमित्ताने एकत्र येऊन सोने आपापसात वाटून आपला आनंद परत आणत असतो. एकमेकांविषयीचे आदर, प्रेम व्यक्त करत असतो. याच दसऱ्याला हिंदू पुराणात साडे तीन मुहूर्तापैकी एक मानले जाते. हा दसरा प्रत्येक माणसामाणसात नवचैतन्य निर्माण करतो, नैराश्य दूर सारून माणसामाणसातील भेदाभेद विसरून वातावरणात नवे तेज निर्माण करून आनंदाचे,वैभवाचे वादळ घेऊन येतो, आणि आपणच या सगळ्याचे साक्षीदार असतो. 
          या दिवशी पूर्वीचे लोक शस्त्रे, भाले, हातखंडे, हत्यारे, अवजारे यांची विधिवत पूजन करून सरस्वतीच्या आशीर्वादाने तृप्त होत असत. तेच आताही महाराष्ट्रात पुरातन परंपरेचा गौरव केला जातो. आजही महाराष्ट्र राज्यात या दसरा सणाला तितकेच महत्त्व दिले जाते. आताच्या पिढीला आपल्या भारतीय संस्कृतीत समाविष्ट असलेल्या रूढी परंपरा माहित व्हाव्या यासाठी तसेच युगानयुगे वा पिढ्यानपिढ्या ही परंपरा अशीच चिरकाल चालू राहण्यासाठी सरस्वती पूजन, लक्ष्मी पूजन, शेती अवजारे व संसाधनांचे पूजन, विद्येचे पूजन, याउलट रोजच्या वापरात असलेली वाहने, शेती कार्यासाठी वापरली जाणारी जमीन, किंवा नवीन प्रकल्पासाठी घेतलेली जमीन यांचे पूजन विधिवत पद्धतीनुसार केले जाते. या दिवशी शुभ मुहूर्त म्हणून दुकानांचे उद्घाटन, इतर कार्यक्रमांचे उद्घाटन ही केले जाते. 
          रामायणात घडल्याप्रमाणे माता सीतेला रावणाच्या लंकेतून सोडवण्यासाठी प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाशी युद्ध करून आजच्या दिवशी विजय प्राप्त केला त्यामुळे या दसरा सणाला "विजयादशमी" हे नामकरण करण्यात आले. तसेच महाभारतानुसार वनवासी गेलेले पाच पांडव ही यादिवशी आपल्या राज्यात परतल्याची आख्यायिका आहे. देवी दुर्गा मातेने महिषासुराचा संहार करत विजय प्राप्त केला होता. त्यामुळे विजयादशमीच्या दिवशी सर्व वाईट शक्ती, असुरी प्रवृत्ती, अहंकार, क्लेश, दुःख, दारिद्र्य या सर्वांचा सर्वनाश होतो अशी मान्यता आहे. आपल्या संरक्षणाचा विजय म्हणून या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून एकमेकांना दिली जातात. 
          परंतु आपण म्हणत असतो रावण क्रूर होता, वाईट शक्तींनी परिपूर्ण होता. रावणाने माता सीतेचे अपहरण करून लंकेत बंदिस्त केले होते ही, तो राम लक्ष्मण सीता पंचवटीत असताना लक्ष्मणने रावणाची बहिण शुर्पनखेचे नाक कापले त्याचा सुड होता असे मला वाटते. कारण वास्तविकरित्या आपण पाहिले तर रावणाने माता सीतेला फक्त बंदिस्त केले होते, माता सितेवर जराही कुठल्याही प्रकारचा अन्याय केला नाही अथवा होऊ दिला नाही, माता सीता तिथेही सुरक्षित होत्या. त्यामुळे रावण वाईट होता असे म्हणता येणार नाही, परंतु रावणाला मिळालेल्या वरदानाने अमर झाला होता. त्याचे मरणे विष्णू देवाच्या हाती लिहिले होते. त्यामुळे हे रामायण घडले. 
          असो. दसरा हा सण सणांचे प्रतीक म्हणून आजही प्रचलित आहे. लोक या दिवशी खास सोन्याचांदीचे दागिने खरेदी करत असतात. तसेच घर, दुकान, जमिनी, वाहने खास या दसरा दिनाचे औचित्य साधून खरेदी करत असतात. महाराष्ट्राच्या पूर्व भागात रामायण नाटक स्वरूपात सादर करून रावण दहन ही करण्याची प्रथा आहे. तसेच या निमित्त खास जत्राही भरवल्या जातात. झेंडूच्या फुलांचे हार बनवून घराला तोरण ही लावले जातात. आपला विजयदशमीचा सण संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा केला जातो. अशा सुख समृद्धी, वैभवाची भरभराट करणाऱ्या दसरा म्हणजेच विजयादशमीच्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा! 

लेखक : नयन धारणकर, नाशिक
----------------------------------------
 ज्ञानेश्वरीतील  सुंदर  प्रतिमाने


या  यज्ञक्रिया  उचिता  । यज्ञेशी  हवन  करिता  । हुतशेष
स्वभावतः ।  उरे  जे  जे  ।।

       ते  सुखे  आपुले  घरी । कुटुंबेसी  भोजन  करी ।  की
भोग्यचि  ते  निवारी  । कल्मषाते।

        ते  यज्ञवशिष्ठ  भोगी । म्हणौनि  सांडिजे  तो   अधी
जयापरी  महारोगी । अम्रुतसिद्धी।


       या प्रमाणे   विहीत  कर्माचरण  व  पंचमहायज्ञादि
करून  जे  यज्ञशेष  अन्न  सहज
बाकी  राहील.

        ते  अन्न  सुखाने  आपल्या
कुटुंबासह  सेवन  करतो . ते
सेव्यरूप-यज्ञशेषसेवनच  त्याच्या
सर्व  पातकांचा  नाश  करते .

       अम्रुताचे  सेवन  केल्यापासून  ज्याप्रमाणे  महारोग्याला   महारोग  सोडून
जातो .त्याप्रमाणे  यज्ञवशिष्ट 
अन्नाचे सेवन  केल्याने  पातके
त्याला  सोडून  जातात.


सौ.  शैलजा  जाधव (पाटील)
           चांदवड   नासिक
-------------------------------------------------------
विचारधारा

एखाद्या व्यक्तीची त्याच्या चांगल्या कामाबद्दल गावांमध्ये किंवा बाहेर ठिकाणाहून वाहवा केल्याचे ऐकायला जेव्हा,मिळते तेव्हा त्याच्या विषयी  बरेचं लोकांना त्याची वाहवा केलेली बघवत नाही.किंवा ऐकवत नाही.   म्हणून ते, आपले सर्व कामे बाजूला सारून. चार,चार जण एकत्र येऊन ग्रुप बणवतात व जागोजागी उभे राहून त्यांची    निंदा करणे सुरू करतात. हे,आधीही तेवढ्याचं प्रमाणात सुरूचं होते.  आणि आजही सारखेचं सुरू आहे. म्हणून त्यांच्या कडे लक्ष देऊ नका. कारण,निंदा, चेष्टा सरळ वाटेवरती चालणाऱ्याच्याचं केल्या जातात.  वाकड्या,तिकड्या मार्गावरती चालणाऱ्याच्या नाही. हे, कायमचं लक्षात असू द्यावे. 

सौ. संगीता संतोष ठलाल
मु. कुरखेडा जि. गडचिरोली
-----------------------------------------------------------
रावण समाजातला...


नमस्कार- वाचकराजा
आजच्या दसऱ्याच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...
आजचा लेख थोडा वेगळ्या धाटणीचा लिहिला आहे, वाचा आणि आपल्या शब्द-सुमनांचा वर्षाव कमेंट मध्ये नक्की करा.

रावण समाजातला...

       विजयादशमी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं; त्यात राम अगदी बरोबर आपल्या भात्यातून एक तीक्ष्ण तिर काढून, तो पेटलेला तिर रावणाच्या दिशेने सोडतो आणि क्षणार्धात रावण आगीच्या लोळात होरपळत होरपळत खाली कोसळतो, म्हणजेच रावण मरतो.
बस्स- मग आपण हे दृश्य पाहतो आणि आनंदून जातो, रामाने रावणाला मारले हे पाहून आपल्याला मनातून खूप समाधान वाटते आणि पुन्हा एकदा आपण आपल्या कामाला निघून जातो, किंवा आपल्याला तेवढंच पाहायचं तर होतं याच उद्देशाने मागे फिरून आपण घरी जातो.

         मला मात्र या छोट्याशा कथेतून एक प्रश्न पडला आहे की, आज रावण खरंच मेला आहे का ? किंवा खरंच तो ज्यावेळी रामाने मारला त्यावेळी नष्ट झाला का ?
थोडा विचार करून आणि समाजाकडे तिरक्या नजरेने पाहिले तर आपणा सर्वांनाही कळेल की मी कोणत्या रावणाबद्दल बोलत आहे. हो - रावण आज सर्वांमध्ये जिवंत आहे, परंतु हा रावण तो नाहीय जो रामाने मारला !! 
अहो !! रामाने ज्या रावणाचा वध केला तो तर विद्वान होता, महापराक्रमी होता, एक चूक जर त्याने केली नसती तर सत्य-युगातही त्याला मारणारा कोणताही वीर जन्मला नव्हता, आणि रावण कधीच मारला गेला नसता.
पण ! आज ठीक-ठिकाणी, सगळीकडे जो रावण दिसतोय, पाहायला मिळतोय तो माणसांत अगदी बऱ्यापैकी रुजलेला आहे, विशेष म्हणजे या रावणाला, रावण नाव देऊन मात्र सगळे मोकळे झाले, परंतु आपण ज्या रावणाच्या नावाने दिवसभर जो जप करतो त्या रावणाची तुलना स्वतःशी करताना लाज वाटली पाहिजे लाज !!
स्वतःमध्ये लपलेला रावण अजून लपविण्यासाठी प्रत्येक जण वाईट कृत्य करून मोकळा होतो, परंतु हे कुणाच्याही लक्षात येत नाही की, आपण आपल्यातल्या रावणाला झाकण्यासाठी एका विद्वानाशी आणि एका महान योध्याशी स्वतःची तुलना करत आहोत.

        आजचा रावण एकमेकांच्या मनाचा खेळ करायला शिकला आहे, एकमेकांवर सूड उगवताना दिसतो आहे, दुसऱ्याला उत्कर्षापासून रोखू पाहत आहे, जो व्यवसायात म्हणा किंवा स्व-बळावर काहीतरी करून दाखवण्याचा तयारीत आहे, त्याला मागे खेचून स्वतःची उन्नती करण्याच्या प्रयत्नात आहे.
आजच्या रावणाला, "तू किती महान आहेस" हे सांगावं लागत नाही तर तो स्वतःच तसे मानून काही अवैचारिक मार्गातून स्वतःचाच विनाश करून घेत आहे. त्याला आपण कोणत्या मार्गाने जात आहोत आणि आपली प्रगती कशी होईल हे कोणी समजावून सांगत सांगत असेल तरीही तो सांगणाऱ्याला मीच तुझ्यापेक्षा श्रेष्ठ कसा आहे हे पटवून देत आहे. मिळविलेल्या संपत्तीचा कुठे व कसा वापर करावा हेही त्याला न कळल्यामुळे स्वतःच्या जवळचे धन नाहीसे करत आहे. कोणाशी कसे बोलावे, कसे वागावे याचेही भान त्याला राहिलेले नाहीय. 

          सध्याची परिस्थिती बदललेली आहे, आपल्या सभोवताली असलेल्या समाजात वावरत असताना कुणालाच कशाचीही तमा राहिलेली नाहीय. आज " स्त्री " ही आपल्या समाजात सुशिक्षित, सक्षम आणि शैक्षणिक जगात कितीही उंच भरारी मारून पुढे जात असली, तरीही " स्त्री " ही सुरक्षित मात्र नक्कीच नाही. रोज घडणाऱ्या घटना पाहता आपण कसं म्हणू शकतो की, माणसांमधला रावण नाहीस झाला आहे. सकाळी उठून टीव्ही चालून करून बातम्यांचे चॅनेल फिरवून बघा, मग कळेल समाजात वावरत असणारा रावण आजही जिवंत आहे की खरोखरच नष्ट झाला आहे. आजही माणसांतला रावण  राजरोस जिवंतच फिरतो आहे, अगदी सर्वांच्या नजरेसमोरून.
हे चित्र जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत तरी रावण मेला किंवा त्याला मारले गेले असे म्हणता येणार नाही. परंतु या रावणाची तुलना महान योद्धा, महापराक्रमी असणाऱ्या रामयणातल्या रावणाशी करू नका; कारण तो रावण असा मुळीच नव्हता, त्याच्या हातात विश्व नष्ट करण्याची ताकद होती, त्याला सर्वांप्रति आदर होता, त्याने कधीही कोणाला उगाचच डिवचले नाही, स्वतःच्या स्वार्थासाठीही त्याने कधी युद्ध केले नाही. 

म्हणूनच प्रत्येकाने आपल्या स्वतःतील रावण स्वतःच मारला पाहिजे, तो ज्याला त्याला ठाऊक असतो. फक्त सकात्मक विचारांची जोड हवी असते, योग्य ज्ञान मिळविण्याची जिज्ञासा असावी लागते. हे गुण प्रत्येकात असतातच परंतु आपल्या समोर घडत असलेल्या चांगल्या वाईट कृत्यांचा परिणाम प्रत्येकावर होत जाऊन सगळ्यांच्या आत असलेला रावण जागा होतो. हे जरी खरे असले तरी त्या जागा झालेल्या रावणाला त्याच जागी थोपविण्याची ताकदही प्रत्येकात असते. स्वतःतल्या रावणाला बाहेर पडू न देवून तिथेच त्याचा शिरच्छेद करता आला पाहिजे तरच प्रत्येक माणूस समाजात निडरपणे राहू शकेल आणि सर्वांची प्रगती होऊन प्रत्येकजण आदराने, सन्मानाने जगेल.



 विजय वैशाली दत्ताराम पराडकर- आण्णा
       ( विरार )

टिप्पण्या