सप्तश्रृंगीच्या चरणी पहिल्याच दिवशी हजारो भाविक नतमस्तक



सप्तश्रृंगीच्या चरणी पहिल्याच दिवशी हजारो भाविक नतमस्तक

करोनाच्या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी टोकन तसेच ऑनलाइन नोंदणी करण्यात आली आहे


नाशिक ‘उदे ग अंबे उदे’ च्या जयघोषात गुरुवारी घराघरांत तसेच सार्वजनिक मंडळात शहरासह जिल्ह्यात देवीची घट रुपात स्थापना झाली. यानिमित्ताने कुंकूमार्चन, सुक्त पठणासह अन्य धार्मिक कार्यक्रम दिवसभर सुरू राहिले. मंदिरे उघडल्याने भाविकांनीही करोना प्रतिबंधक नियम पाळून देवीचे दर्शन घेतले. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या वणीच्या सप्तश्रृंगी माता मंदिर येथे तसेच कालिका माता मंदिरासह जिल्ह्यातील इतर देवी मंदिरांमध्ये भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली होती. करोनाच्या दुसऱ्या लाटेवर मात करून आशावादाने पुढे निघालेल्या भाविकांसाठी गुरुवारपासून नवरात्रोत्सवाचे चैतन्यपर्व सुरू झाले. गुरुवारी मंदिरे दीड वर्षांनंतर उघडली. मंदिरांच्या व्यवस्थापनानेही ठराविक वेळेनंतर स्वच्छतेसह इतर गोष्टींवर भर दिला. विद्युत रोषणाईने मंदिरांचा लखलखाट वाढल्याचे दिसून आले.  शहराचे ग्रामदैवत असलेले कालिका माता मंदिर, भगूरची रेणुका माता, गोदाकाठावरील सांडव्यावरची देवी यासह अन्य देवी मंदिरातही घट स्थापना झाली. करोनाच्या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी टोकन तसेच ऑनलाइन नोंदणी करण्यात आली आहे. या व्यवस्थेची माहिती असल्याने भाविकांनी या सेवेचा लाभ घेतला. यंदा करोनाचे सावट कायम असल्याने सार्वजनिक उत्सवावर निर्बंध आहेत. 

....................................

टिप्पण्या