केशकर्तनालय, ब्यूटीपार्लरना अजूनही ग्राहकांची प्रतीक्षा

केशकर्तनालय, ब्यूटीपार्लरना अजूनही ग्राहकांची प्रतीक्षा

करोनापूर्व काळाच्या तुलनेत ६० टक्कय़ांपेक्षा कमी ग्राहक

 करोनाच्या प्रादुर्भावामुळे कमी झालेले सार्वजनिक कार्यक्रम, पूर्ण क्षमतेने सुरू नसलेली कार्यालये अशा काही कारणांमुळे केशकर्तनालय, ब्यूटीपार्लरमध्ये जाणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण कमी झाले आहे. करोनापूर्व काळाच्या तुलनेत ६० टक्कय़ांपेक्षा कमी ग्राहक केशकर्तनालय, ब्यूटीपार्लरमध्ये येत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

 केशकर्तनालय, ब्युटीपार्लरमध्ये व्यावसायिकांचा ग्राहकांशी थेट संपर्क येतो. करोनाची लागण होण्यात थेट संपर्क प्रमुख कारण ठरत असल्याचा फटका केशकर्तनालय आणि ब्यूटीपार्लर व्यवसायाला बसला आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या पहिल्या आणि दुसऱ्या टाळेबंदीत केशकर्तनालय, ब्यूटीपार्लर बंद ठेवावे लागले होते. करोनाचा प्रादुर्भाव पसरू नये म्हणून शासनाने शाळा-महाविद्यालये बंदच ठेवली होती, विवाहासारख्या कार्यक्रमांमध्ये उपस्थितीवर मर्यादा होती, तर अन्य सार्वजनिक कार्यक्रम बंदच होते. त्यामुळे केशकर्तनालय, ब्यूटीपार्लर व्यवसायावर परिणाम झाला.

करोना काळात घरातून काम करण्याची पद्धत सुरू झाल्याने अनेकांना कार्यालयीन कामासाठी घराबाहेर पडावे लागले नाही. र्निबध शिथिल झाल्यानंतरही अनेक कार्यालयांमध्ये पूर्ण क्षमतेने कर्मचारी जात नाहीत. त्यामुळे केशकर्तनालय, ब्यूटीपार्लरमध्ये येणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. विवाहासारख्या मोठय़ा समारंभांचे प्रमाणही पूर्वीच्या तुलनेत कमी असल्याचे निरीक्षण व्यावसायिकांनी नोंदवले.

करोना संसर्गाची भीती अजूनही आहे. त्यामुळे ग्राहक केशकर्तनालयात येत नाहीत. केशकर्तनालयासाठी शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी हा मोठा ग्राहकवर्ग असतो. आतापर्यंत शाळा-महाविद्यालये बंदच असल्याने हा वर्ग येत नाही. अनेकांनी केस कापण्यातील, दाढी करण्यातील कालावधी वाढवल्याने दर महिन्याला येणारा ग्राहक दोन-तीन महिन्यातून एकदाच येतो.

– अमित शिंदे, व्यावसायिक

करोना काळात नोकरदारांच्या नोकऱ्या गेल्याने, उत्पन्न कमी झाल्याने सलून, ब्यूटीपार्लरचे महत्त्व कमी झाले. करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे व्यवसायाच्या खर्चातही वाढ झाली आहे. करोना भीतीमुळे ग्राहाच्या मनात सलून, ब्यूटीपार्लरमधील स्वच्छतेबाबत शंका निर्माण झाली आहे. मात्र काळजी घेतल्याशिवाय पर्यायच नाही. कारण आम्हाला आमच्या कुटुंबाचीही काळजी आहेच.

– जयश्री जगताप, मृणाल जगताप,  व्यावसायिक

आतापर्यंत शाळा-महाविद्यालये सुरू नव्हती, मोठय़ा कार्यक्रमांचे प्रमाणही कमी झाल्याने अनेक लोक आता स्वत:च घरी दाढी, केशकर्तन करू लागले आहेत. अशा वेगवेगळ्या कारणांनी केशकर्तनालयात येणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण कमी झाले आहे. करोनापूर्व काळाच्या तुलनेत ६० टक्केपेक्षा कमी

ग्राहक येत आहेत. केशकर्तनालयाचे जागा भाडेही निघण्याचा प्रश्न आहे.

– महेश सांगळे, पुणे शहराध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या