राष्ट्रीय उद्यानातील सिंह सफारीचे विस्तारीकरण रखडले

 

राष्ट्रीय उद्यानातील सिंह सफारीचे विस्तारीकरण रखडले

राष्ट्रीय उद्यानातील सिंह सफारीचे विस्तारीकरण रखडले


‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’त १२ हेक्टर क्षेत्र सिंह सफारीसाठी वापरले जात होते.


कंत्राटदारांना खर्च परवडेनासा झाल्याने काम अर्धवट

मुंबई : प्रत्यक्ष पाहणी करून तांत्रिक गोष्टींचा विचार न करता तयार केलेल्या अंदाजपत्रकाचा परिणाम म्हणून ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’तील सिंह सफारीच्या विस्तारीकरणाचे काम रखडले आहे. २०१७मध्ये सुरू झालेले विस्तारीकरणाचे काम काहीच महिन्यांत कंत्राटदारांनी अर्धवट सोडल्याने पर्यटकांना सफारीच्या आनंदाशी तडजोड करावी लागत आहे.

‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’त १२ हेक्टर क्षेत्र सिंह सफारीसाठी वापरले जात होते. ‘केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणा’ने २०१६मध्ये सर्वेक्षण केल्यानंतर सफारीचे क्षेत्र २० हेक्टपर्यंत वाढवण्याची सूचना केली. त्यानुसार २०१७मध्ये काम हाती घेण्यात आले. ‘सिंह सफारीपर्यंत मालवाहतूक वाहने पोहोचण्यासाठी पुरेसा रस्ता उपलब्ध नाही, मात्र या अडचणीचा विचार कामासाठी तयार करण्यात आलेल्या अंदाजपत्रकात करण्यात आला नव्हता. त्यामुळे कंत्राटदारांना खर्च परवडेनासा होऊन त्यांनी काम अर्धवट सोडले,’ अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

सध्या करोनास्थितीमुळे सफारी बंद असली तरीही सर्वसाधारण स्थितीत सिंह सफारी आणि व्याघ्र सफारी दोन्हींचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी दोन लाख पर्यटक येतात. एरव्ही १२ हेक्टर क्षेत्रामध्ये सफारी सुरू असताना भोवताली सिंह वावरत असतात व त्यांच्यामधून सफारीचे वाहन चालते. त्यामुळे पर्यटकांना प्राणी जवळून पाहाता येतात. याउलट, सध्या विस्तारीकरणाचे काम रखडल्याने १ ते २ हेक्टर इतक्या छोटय़ा क्षेत्रात सिंह वावरत असतात व त्यांच्या भोवताली सफारीचे वाहन फिरते.

व्याघ्र सफारीचेही क्षेत्र आक्रसले

व्याघ्र सफारीचे क्षेत्र २० हेक्टर आहे. येथे जाळीच्या मोठय़ा कुंपणात वाघ फिरत असतात व त्यांच्यामधून सफारीचे वाहन फिरते; कुंपण जीर्ण झाल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम होणे आवश्यक आहे. त्यामुळे सिंह सफारीप्रमाणेच व्याघ्र सफारीही २०१९ सालापासून छोटय़ा क्षेत्रात चालवली जात आहे. व्याघ्र सफारीसाठी निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे ‘सार्वजनिक बांधकाम विभागा’चे मुख्य अभियंता खंडेराव पाटील यांनी सांगितले.

कंत्राटदारांच्या काही तांत्रिक अडचणी असल्याने त्यांनी सिंह सफारीच्या विस्तारीकरणाचे काम अर्धवट सोडले. या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तीन कोटी रुपये जमा आहेत. त्याच रकमेत त्यांनी काम पूर्ण करून देणे अपेक्षित आहे. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. व्याघ्र सफारीसाठीही पुनर्निविदा काढली जाणार आहे. डिसेंबपर्यंत दोन्ही सफारी सुरू होणे अपेक्षित आहे.  – जी. मल्लिकार्जुन, संचालक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

....................................
------------------------------

www.freshnewz.in

Comments