आजची भावलेली कविता-बाप आठव नेहमी..…
आजची भावलेली कविता
बाप आठव नेहमी..…
तुला बघायला मुली
वेळ मिळेना बापाला ।
नित्य सकाळी सकाळी
जावे लागते कामाला ।।
काय करणार सांग
कष्ट केले नाही तर? ।
तुला उपाशी राहता
बघणार जन्मभर? ।।
बापासाठी तूच परी
तूच वेदना नाशक ।
दुःख क्षणात भुलतो
अगं जगाचा मालक ।।
बोल बोबडे तुझेच
तरसतो ऐकायला ।
बाप कामात राहतो
तुझे पोट भरायला ।।
नको बापाला भुलूस
तुझ्या सुखाच्या क्षणात ।
बाप आठव नेहमी
जोड त्याच्यापुढे हात ।।
शब्दसखा-अजय रमेश चव्हाण, तरनोळी
ता.दारव्हा, जि.यवतमाळ
मो.८८०५८३६२०७
------------------------------------------
कष्टकरी माझा बाप..…
कष्टकरी माझा बाप
शेतकरी माझा बाप ।
नित्य जगास पोसतो
सेवेकरी माझा बाप ।।
घरदार सोडूनिया
रोज शेतात झोपतो ।
स्वतः उपाशी राहून
निगा पिकांची राखतो ।।
श्वेत सोनं पिकवतो
तरीपण स्वतः दीन ।
माझा बाप शेतामध्ये
जसा पाण्यामध्ये मिन ।।
माझे दुःख विसरतो
घाम बापाचे बघता ।
दुःखामध्ये राहूनही
क्षण सुखाचे टिपता ।।
जन्मभर ऋण कसा
कोण फेडणार त्याचे ।
बापाविन दावणार
कोण दिवस सुखाचे? ।।
शब्दसखा-अजय रमेश चव्हाण, तरनोळी
ता.दारव्हा, जि.यवतमाळ
मो.८८०५८३६२०७

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा