दहीहंडीऐवजी शिवसेनेकडून आरोग्य शिबिरे


दहीहंडीऐवजी शिवसेनेकडून आरोग्य शिबिरे

दहीहंडीऐवजी शिवसेनेकडून आरोग्य शिबिरे


दहीहंडी उत्सवात गर्दी होत असल्याने राज्य सरकारने दहीहंडी उत्सवाला परवानगी नाकारली होती.


हंडी फोडल्याने मनसेचे पदाधिकारी ताब्यात; शहरात कडेकोट बंदोबस्त


ठाणे : करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत सत्ताधारी शिवसेनेच्या ठाण्यातील नेत्यांनी दहीहंडी उत्सव रद्द करून त्याऐवजी आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रात्रीच्या सुमारास दोन ठिकाणी दहीहंडी फोडून राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. या प्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्याबरोबरच असे प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी संपूर्ण शहरात बंदोबस्त वाढविला होता.

नौपाडा पोलीस सकाळपासूनच भगवती शाळेचे मैदान आणि परिसरात ठाण मांडून होते. मुंबईतील काही महत्त्वाच्या गोविंदा पथकांना संपर्क साधत दहीहंडीसाठी ठाण्यात येऊ नका, अशा सूचना पोलिसांनी दिल्या. तसेच शहरातील गोविंदा पथकांनाही नोटिसा धाडल्या होत्या.

दहीहंडी उत्सवात गर्दी होत असल्याने राज्य सरकारने दहीहंडी उत्सवाला परवानगी नाकारली होती. या आवाहनाला प्रतिसाद देत सत्ताधारी शिवसेनेच्या ठाण्यातील नेत्यांनी दहीहंडी उत्सव रद्द करून त्याऐवजी आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानने वर्तकनगर येथे तर शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी जांभळी नाका येथे आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. तसेच शिवसेनेने टेंभीनाक्यावरील हंडी रद्द करून त्या ठिकाणी आरोग्य शिबीर आयोजित केले होते. विशेष म्हणजे या आरोग्य शिबिरांमध्येही नागरिकांची गर्दी झाली होती.

मनसेकडून दहिहंडीचे आयोजन

पोलिसांची नजर चुकवीत मनसेने नौपाडय़ातील पक्ष कार्यालयासमोर सोमवारी रात्री दहीहंडी उभारली आणि दोन थर लावून ही हंडी फोडली. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यापूर्वी वर्तकनगर येथील लक्ष्मीपार्क परिसरात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी चार थर लावून हंडी फोडली. यानंतर सतर्क झालेल्या पोलिसांनी शहरात पोलीस बंदोबस्त वाढविला.

....................................
------------------------------

www.freshnewz.in

Comments