निर्बंध डावलून ‘काला’


निर्बंध डावलून ‘काला’

निर्बंध डावलून ‘काला’



मध्यरात्रीपासूनच मुंबईत दहीहंडीचा उत्सव; करोना नियमांवर पाणी


मुंबई : राज्य सरकारची नियमावली आणि पोलिसांनी दिलेल्या सूचना धुडकावून मुंबईतील अनेक गोविंदा पथकांनी जन्माष्टमीचा मुहूर्त साधून सोमवारी मध्यरात्री आणि मंगळवारी पहाटे दहीहंडी उत्सव साजरा केला. काही भागात करोना प्रतिबंधात्मक नियमांना हरताळ फासून गोविंदांनी वाद्याच्या तालावर थिरकत उत्सव साजरा केला. काही ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली, परंतु अनेक ठिकाणी मात्र स्थानिक गोविंदा पथकांचा मनमानी कारभार सुरू होता.

करोनाचा संसर्ग पुन्हा बळावत असल्याने राज्यात पुन्हा कडक र्निबधांचे संकेत दिले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहीहंडी उत्सव साजरा करण्यास मनाई केली होती. दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने गर्दी होऊन संसर्ग वाढीचा धोका अधिक असल्याने हा निर्णय घेण्यात आला होता.

या निर्णयाला सुरुवातीपासूनच मुंबईतील गोविंदा पथके आणि राजकीय पक्षांकडून तीव्र विरोध केला जात होता. या विरोधाचा अंदाज घेऊन पोलिसांनी सोमवारीच गोविंदा पथकांवर नोटिसा बजावल्या होत्या. परंतु सर्व नियम झुगारून गोविंदानी थरावर थर रचले. दिवसाउजेडी कारवाई केली जाईल म्हणून अनेक ठिकाणी मध्यरात्रीच दहीहंडी फोडण्यात आली, तर काही ठिकाणी भल्या पहाटे दहीहंडी फोडून उत्सव साजरा करण्यात आला.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुलुंड, मानखुर्द, भांडुप, घाटकोपर, साकीनाका, वरळी या ठिकाणी मानवी थर रचून मध्यरात्रीच उत्सव साजरा केला. दहीहंडी उत्सव आयोजनस्थळी गर्दी झाली होती, तर गिरगाव, वरळी, भायखळा, दादर, लालबाग, धारावी, माहीम आणि मुंबईसह उपनगरात अनेक चाळींमध्ये, गृहसंस्थांमध्ये दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. थरांची उंची कमी असली तरी शेकडो लोक यानिमित्ताने एकत्र आले होते. मुखपट्टी, अंतरनियम याचा गोविंदांसह नागरिकांना विसर पडल्याचे दिसत होते.

पोलिसांची कारवाई

निर्बंध डावलून दहीहंडी उत्सव साजरा करणाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. मुंबईत वरळी, घाटकोपर, साकीनाका, काळाचौकी, दादर, कस्तुरबा मार्ग- बोरिवली  या सहा ठिकाणी कारवाई करण्यात आली. करोना नियमांचे उल्लंघन, साथरोगात संसर्ग पसरवण्याची कृती केल्याप्रकरणी, सरकारी आदेश धुडकावल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांचा सहभाग अधिक होता. या कार्यकर्त्यांना करवाई करून पोलिसांनी ताब्यातही घेतले.

....................................
------------------------------

www.freshnewz.in

Comments