देशातील अनेक राज्यांतील शाळा सुरू


देशातील अनेक राज्यांतील शाळा सुरू

देशातील अनेक राज्यांतील शाळा सुरू

 


नवी दिल्ली: करोनाविषयक परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्यांमधील शाळांची दारे बुधवारपासून उघडली. मात्र करोनाचा संसर्ग वाढण्याचे हे कारण ठरू नये म्हणून करोनाबाबतच्या निर्बंधांचे पालन करण्याची खबरदारी सर्वच राज्यांतील प्रशासनांनी घेतली आहे.

दिल्लीत मुसळधार पाऊस पडत असतानाच, मुखपट्ट्या घातलेले आणि छत्र्या घेतलेले नववी ते बारावीचे विद्यार्थी शाळांमध्ये परतले. काही शिक्षण संस्थांनी मात्र ‘बघा आणि वाट पाहा’ धोरण स्वीकारले असून, विद्यार्थ्यांना काही आठवड्यांनंतरच वर्गातील प्रत्यक्ष उपस्थितीसाठी बोलावले आहे.

दिल्लीतील करोनाविषयक परिस्थितीत सुधारणा झाल्याने नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा, महाविद्यालये आणि शिकवणी वर्ग १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होतील असे दिल्ली सरकारने शुक्रवारी जाहीर केले होते. मात्र कुठल्याही विद्याथ्र्यावर प्रत्यक्ष उपस्थितीसाठी सक्ती राहणार नाही आणि पालकांची संमती अनिवार्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. प्रत्येक वर्गात ५० टक्के उपस्थितीच्या मर्यादेसह मध्य प्रदेशात सहावी ते बारावीचे वर्ग बुधवारी सुरू झाले.

मध्य प्रदेश सरकारने यापूर्वी नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के उपस्थितीच्या मर्यादेसह जुलैच्या शेवटच्या आठवड्यात वर्ग सुरू केले होते; मात्र हे वर्ग आठवड्यातील ठरावीक दिवशी होत होते. बुधवारी पहिल्या दिवशी शाळांमध्ये उपस्थिती कमी होती, मात्र जवळजवळ १७ महिन्यांनंतर वर्गात प्रत्यक्ष उपस्थित राहता आल्याबद्दल विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.

राजस्थानमध्ये सरकारी आणि खासगी शाळांमधील नववी ते बारावीचे वर्ग पुन्हा सुरू झाले. करोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गाची प्रकरणे वाढल्यामुळे गेल्या चार महिन्यांहून अधिक काळ या शाळा बंद होत्या.

मात्र सोबतच ऑनलाइन वर्गही घेण्यात येत असल्याने पहिल्या दिवशी शाळांमध्ये फारशी उपस्थिती नव्हती. शिक्षण विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, वर्गात एकावेळी फक्त ५० टक्के क्षमतेला परवानगी असून, करोनाविषयक नियमांचे कठोर पालन केले जाणार आहे.

तमिळनाडूत करोनाविषयक आदर्श कार्यप्रणालीचे पालन करून नववी ते बारावीचे प्रत्यक्ष वर्ग पुन्हा सुरू झाले. राज्यातील महाविद्यालयांचे वर्गही बुधवारी सुरू झाले आहेत.

राज्यात करोना संसर्गाच्या प्रमाणात बरीच वाढ झाल्याच्या पाश्र्वाभूमीवर, नववी, दहावी आणि अकरावीचे वर्ग २२ मार्चपासून पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचे निर्देश सरकारने दिले होते. तथापि, बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा असल्याने त्यांचे वर्ग सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती.

उत्तर प्रदेशात करोनाशी संबंधित टाळेबंदीमुळे गेल्या वर्षी २० मार्चपासून बंद करण्यात आलेले प्राथमिक शाळांचे वर्ग बुधवारी पहिल्यांदा उघडले. नववी ते बारावी आणि सहावी ते आठवी यांचे वर्ग अनुक्रमे १६ व २४ ऑगस्टपासून सुरू झाले होते.

तेलंगणात निवासी सरकारी शैक्षणिक संस्था वगळता इतर शाळांचे वर्ग बुधवारपासून सुरू झाले. करोनाविषयक नियमांचे पालन करून महाविद्यालयेही सुरू झाली आहेत.

पहिली ते बारावीचे वर्ग उच्च न्यायालयाने मंगळवारी दिलेल्या आदेशानुसार सुरू झाले. सरकारी निवासी शाळांना मात्र ४ आठवडे वर्ग सुरू करण्यावर न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

छत्तीसगडमध्ये गुरुवारपासून

छत्तीसगमध्ये करोनाविषयक परिस्थिती सुधारल्यामुळे सरकारी व खासगी शाळांमधील सहावी, सातवी, नववी आणि अकरावीचे वर्ग ५० टक्के उपस्थितीसह गुरुवारपासून सुरू करण्याची परवानगी देणारा आदेश राज्य सरकारने बुधवारी जारी केला. पहिली ते पाचवी, आठवी, दहावी आणि बारावीचे वर्ग शाळांनी यापूर्वीच १ ऑगस्टपासून सुरू केले आहेत. ग्रामीण भागातील शाळांना ग्रामपंचायती आणि पालक समित्यांची शिफारस मिळवावी लागणार असून, शहरी भागातील शिक्षण संस्थांसाठी नगरसेवक आणि पालक समित्यांची शिफारस आवश्यक असणार आहे. लडाखमध्ये सहावी ते आठवीचे वर्ग ६ सप्टेंबरपासून सुरू करण्यास सर्व शाळांना परवानगी देण्याची घोषणा लेह जिल्हा प्रशासनाने मंगळवारी केली.


....................................
------------------------------

www.freshnewz.in

Comments