मराठवाडय़ात पावसाने दाणादाण

 

मराठवाडय़ात पावसाने दाणादाण

मराठवाडय़ात पावसाने दाणादाण


औरंगाबाद जिल्ह्य़ातील कन्नड, गंगापूर आणि वैजापूर  या तीन तालुक्यांत जोरदार पाऊस झाला.


सहा जण पुरात वाहून गेले; कन्नडमध्ये सात ठिकाणी दरड कोसळली; खरीप पिकांचेही नुकसान


औरंगाबाद : मराठवाडय़ात काही दिवसाच्या विश्रातीनंतर आलेल्या पावसाने दाणदाण उडवून दिली. सोमवारी मध्यरात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे बीड आणि नांदेड जिल्ह्य़ातील सहाजण पुरात वाहून गेले. औरंगाबाद जिल्ह्य़ातील कन्नड तालुक्यात औट्रम घाटात दरडी कोसळल्याने औरंगाबाद-धुळे महामार्गावरील वाहतूक दुपापर्यंत ठप्प होती. काही गावांमध्ये पाझर तलाव फुटल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले असून खरीप पिकांना फटका बसला आहे.  मराठवाडय़ातील ४२० महसूल मंडळांपैकी ६७  महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

औरंगाबाद जिल्ह्य़ातील कन्नड, गंगापूर आणि वैजापूर  या तीन तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. कन्नड घाटातील औट्रम घाटात सात ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या. महामार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक दुपापर्यंत ठप्प होती. नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी भेट दिली. या तालुक्यांतील नागद, बेलदरी या गावांमध्ये अतिवृष्टी झाल्याने बेलदिरी येथील दोन पाझर तलाव फुटले. परिणामी शेती खरवडून गेली असल्याची माहिती कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत यांनी दिली. रायगव्हाण, नागद, वडगाव जाधव या गावांमध्ये घरांमध्ये पाणी शिरल्याच्या वृत्ताला कन्नडचे तहसीलदार संजय वरकड यांनी दुजोरा दिला.

कंधार तालुक्यातील मौजे, गगनबीड येथे उमेश रामराव मदेबैनवाद हे पुराच्या पाण्यात वाहून गेले. लोहा तालुक्यातील सावरगाव येथे ढगफुटी झाल्याने मनकर्णाबाई बाबुराव दगडगावे, पार्वतीबाई संभाजी दगडगावे या दोघी वाहून गेल्या.  गेवराई तालुक्यातील अमृता धर्मराज कोरडे, नेहा धर्मराज काोरडे ही आठ वर्षांचे बहीण- भाऊ गोदावरी पात्रात वाहून गेली. तसेच वडवणी तालुक्यातील पिंपळनेर येथील मयूर विश्वनाथ थोरात हा २२ वर्षांचा तरुण वाहून गेल्याचे वृत्त आहे. अंबाजोगाई तालुक्यातील लघुसिंचन कालव्यात वाहून गेल्याचे तहसील कार्यालयाने विभागीय आयुक्तांना कळविले आहे.

मराठवाडय़ातील ६७ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. त्यात बीडमधील ३७ मंडळांचा समावेश असून या जिल्ह्य़ातील पिंपळनेर मंडळात सर्वाधिक २१४.५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

औरंगााबद जिल्ह्य़ातील विहामांडवा (ता.पैठण), लोणी (वैजापूर), कन्नड, चापनेर, चिकलठाण, पिशोर, नाचनवेल, चिंचोली व करंजखेड (सर्व कन्नड), अशा नऊ मंडळांचा समावेश आहे. जालन्यातील भोकरदनमधील पिंपळगाव, अंबड, जामखेड, रोहिलागड, घनसावंगी, तीर्थपुरी, कुंभार पिंपळगाव, अंतरवली. बीडमधील बीड, पाली, म्हालसजवळा (१६६.२५), नालवंडी (१९०.२५ मिमी), पिंपळनेर (२१४.५०), पेंडगाव, चौसाळा, नेकनूर, अंमळनेर, आष्टी, ढवळवाडी, धामनगाव, धानोरा, पिंपळा, गेवराई, मादळमोही, जातेगाव, पाचेगाव, उमापूर, चकलांबा, सिरसदेवी, रेवकी, तलवाडा, तालखेड, अंबाजोगाई, पाटोदा, लोखंडी सावरगाव, घाटनांदूर, वडवणी, कवडगाव, शिरूर, रायमोहा, तसेच लातूरमधील किनगाव, निलंगा, पानगाव, कारेपूर, तर उस्मानाबादमधील वाशीजवळील पारगाव मंडळासह नांदेडमधील मुखेड, जांब, चांडोला, कुरुला, लोहा, माळाकोळी, खानापूर तर परभणीतील पाथरी तालुक्यातील हदगाव, कसापुरी, पालम, बनवास, पेठशिवण मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

विष्णुपुरीचे तीन दरवाजे उघडले

नांदेड : दोन दिवसांच्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पातळीत वाढ झाली असून कै. डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. ९४२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रकल्प मंगळवारी दुपापर्यंत १०० टक्के भरला असून ४, ५ व ११ क्रमांकांचे दरवाजे उघडण्यात आले असून आणखीही काही दरवाजे उघडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भोकरमध्ये घरांमध्ये पाणीच पाणी झाले होते.  भोकर शहरातील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. परिसरातील नदी-नाल्यांना पूर आला. मुदखेड रोडवरील २० ते २५ घरांमध्ये पाणी शिरले असून नगरपालिकेचे एक पथक पाहणी करून गेले. सोमवारी रात्री पावसाचा जोर वाढल्यानंतर घरांमध्ये पाणी शिरल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

जालन्याने पावसाची सरासरी ओलांडली 

जालना : जिल्ह्य़ात मंगळवारी रात्री  आणि बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्य़ातील आठही तालुक्यांनी पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली. जिल्ह्य़ाची अपेक्षित वार्षिक सरासरी ६०३ मि.मी. असून आतापर्यंत प्रत्यक्षात सरासरी ६६७ मि.मी. पाऊस झाला आहे. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या तुलनेत ११० टक्के आहे. पावसामुळे गोदावरी नदीवरील राजाटाकळी आणि हिरडपुरी उच्चस्तरीय बंधारे ओसंडून वाहू लागले. राजाटाकळी उच्चस्तरीय बंधाऱ्याचे सात तर हिरडपुरी येथील बंधाऱ्याचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्य़ात अपेक्षित सरासरी पाऊस ४६१ मि.मी. होता. परंतु प्रत्यक्षात त्या तुलनेत सरासरी १४५ मि.मी. पाऊस आहे. बुधवारी जिल्ह्य़ात सरासरी ३८ मि.मी. पाऊस झाला. सर्वाधिक ६१ मि.मी. पाऊस अंबड तालुक्यात झाला असून त्याखालोखाल ४६ मि.मी. पाऊस परतूर तालुक्यात झाला आहे.

परभणी जिल्ह्यत जोरदार पाऊस

परभणी : जिल्ह्यत सोमवारी सायंकाळपासून रात्रभर भिज पाऊस झाल्यानंतर मंगळवारी (दि.३१) पहाटेपासून अनेक तालुक्यात पुन्हा पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यतल्या काही मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद असून निम्न दुधना धरणात ८९.५० टक्के जलसाठा आता निर्माण झाला आहे. जिल्ह्यत जून ते सप्टेंबर या काळात साधारणत: एकूण सरासरी ७६१.३ मिमी पाऊस पडतो. जिल्ह्यत १ जूनपासून ३१ ऑगस्टपर्यंत ७१७.८ मिमी पावसाची नोंद झालेली असूल हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या ९४.३ टक्के इतके आहे. पाथरी तालुक्यातील चार महसूल मंडळात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. हादगांव बु.येथे घराघरात व दुकानात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्यासह, किराणा, कापड, सिमेंट यासह साहित्याचे नुकसान झाले असून जवळपास २०० एकर जमिनीतील पिकांत पाणी शिरले आहे. दरम्यान नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार कठ्ठे यांनी दिले आहेत. दरम्यान आष्टी ते हादगांव बु.ते पाथरी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती.

नांदेडमध्ये तिघे पुरात वाहून गेले

नांदेड : पावसाच्या जोरदार आगमनानंतर नदी-नाल्यांना आलेल्या पुरात जिल्ह्य़ातील मुखेड, लोहा व कंधार तालुक्यात मिळून तिघे वाहून गेले. मुखेड तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून उन्द्री (पदे) येथील नाल्याशेजारी प्रातर्विधीसाठी गेलेला १५ वर्षांचा कमलाकर दत्तात्रय गडाळे हा मुलगा नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेला. मंगळवारी दुपारी त्याचा मृतदेह चोंडी शिवारात आढळून आला. दुसरी घटना लोहा तालुक्यातील कोष्ठवाडी येथे घडली. स्थानिक ज्ञानेश्वर माधव वाघमोडे हा सोमवारी सकाळी जनावरे चारण्यासाठी गेला होता. घराकडे परतत असताना अचानक नदीला आलेल्या पुरात ज्ञानेश्वर वाहून गेला. दीड किमी अंतरावर त्याचा मृतदेह सापडला. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी याच परिसरातून दोन महिला वाहून गेल्याचीही घटना घडली आहे. तर कंधार तालुक्यातील गंगनबीड येथील उमेश रामराव बैनवाड (वय २५) हा शेतकरी वाहून गेला.

....................................
------------------------------

www.freshnewz.in

Comments