आरक्षण मिळाल्याशिवाय कुठलीही निवडणूक होऊ देणार नाही-विजय वडेट्टीवार


आरक्षण मिळाल्याशिवाय कुठलीही निवडणूक होऊ देणार नाही

आरक्षण मिळाल्याशिवाय कुठलीही निवडणूक होऊ देणार नाही


‘ओबीसी’ मेळाव्यात विजय वडेट्टीवार यांचा इशारा

सत्तेला झुकविण्याची ‘ओबीसी’ना ताकद निर्माण करावी लागणार आहे. त्यांच्या हक्काचे राजकीय आरक्षण त्यांना पुन्हा मिळाल्याशिवाय कुठलीही निवडणूक होऊ देणार नसल्याचा इशारा ओबीसी विकासमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला.

भटक्या विमुक्त जाती—जमाती मुक्ती दिनाचे औचित्य साधून मंगळवारी जुळे सोलापुरात भटक्या विमुक्त व ओबीसींचा राज्यस्तरीय मेळावा आयोजिला होता. त्यावेळी वडेट्टीवार हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी भाजपचे नेते, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई, आमदार प्रणिती शिंदे, माकपचे नेते नरसय्या आडम, ‘उपरा’कार लक्ष्मण माने, ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड, ओबीसी मेळाव्याचे राज्य समन्वयक रामराव वडकुते उपस्थित होते.

वडेट्टीवार म्हणाले, की ३१ ऑगस्ट १९५२ रोजी देशाचे भाग्यविधाते पं. जवाहरलाल नेहरूंनी भटक्या विमुक्त जाती—जमातींवरचा गुन्हेगारीचा शिक्का पुसून त्यांना तारेच्या कुंपणातून मुक्त केले. या ऐतिहासिक आणि क्रांतिकारक घटनेला ७० वर्षे लोटली तरीही भटक्या विमुक्तांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन अजून बदलला नाही. भटक्या विमुक्त जाती—जमातींसह ओबीसी समाजाने प्रस्थापितांविरुध्द लढण्याची ताकद निर्माण केल्याशिवाय आपले हक्क मिळणार नाहीत. हक्क मागणे हा गुन्हा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी अठरापगड जातींना एकत्र केले आणि स्वराज्य निर्माण केले. परंतु आज काहीजण महाराज ‘आमचे—तुमचे’ अशा भेदभावाची भाषा करतात. या सत्तेला झुकविण्याची ताकद निर्माण करावी लागणार असल्याचे त्यांनी नमूद केले. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय आगामी कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही, या इशाऱ्याचा त्यांनी पुनरूच्चार केला.

भाजपचे नेते बावनकुळे म्हणाले, की पक्षीय राजकारणापलीकडे जाऊ न ओबीसी समाजाला स्वत:च्या हक्काची लढाई लढावी लागणार आहे. त्यासाठी विजय वडेट्टीवार हे ओबीसींना न्याय मिळवून देण्यासाठी एकमेव धडपड करीत आहेत. यात त्यांना आपले नेहमीच समर्थन राहणार आहे. या सभेत लक्ष्मण माने, हुसेन दलवाई यांचीही भाषणे झाली.

....................................
------------------------------

www.freshnewz.in

Comments