‘स्टार्ट अप’ संस्कृती उज्ज्वल भवितव्याचे लक्षण!



‘स्टार्ट अप’ संस्कृती उज्ज्वल भवितव्याचे लक्षण!

‘स्टार्ट अप’ संस्कृती उज्ज्वल भवितव्याचे लक्षण!


पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन

 स्टार्ट अप संस्कृती भारतातील तरुणांमध्ये रुजली असून लहान  शहरेही आता स्टार्ट अप सुरू करू लागली आहेत, हे भारताच्या उज्ज्वल भवितव्याचे लक्षण आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात व्यक्त केले आहे.

त्यांनी सांगितले की, देशात अवकाश क्षेत्रात सुधारणा करण्यात आल्याने आता लोकांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळत आहे. यापुढील काळात विद्यापीठे, प्रयोगशाळा व इतर क्षेत्रांतील तरुणांच्या संकल्पनेतून साकारलेले उपग्रह सोडले जातील यात शंका नाही.

भारताची समृद्ध आध्यात्मिक परंपरा मोठी असल्याचे सांगून त्यांनी सांगितले की, भारताची टोक्यो ऑलिंपिकमध्ये कामगिरी चांगली झाली. हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली.

भारताने चार दशकानंतर पुरुषांच्या हॉकीत पदक मिळवल्याचे सांगून ते म्हणाले की, युवक आता क्रीडा क्षेत्राकडे आकर्षित होत आहेत. पालकही त्यांच्या पाठीशी आहेत. ध्यानचंद यांना हीच खरी श्रद्धांजली आहे. तरुण लोकांची मनोवृत्ती आता बदलली असून त्यांनी नवे मार्ग, नव्या आशाआकांक्षा, यांचा अंगीकार केला आहे. त्यांची उद्दिष्टेही वेगळी आहेत. क्रीडा संस्कृतीला गती मिळत असून ग्रामपातळीवरही आता क्रीडा स्पर्धा होत आहेत. लोकांनी क्रीडा संस्कृती अशीच पुढे न्यावी. जे काही आपण करू शकतो ते करावे. ‘सबका प्रयास’ हा मंत्र त्यांनी प्रत्यक्षात उतरवावा.

भारताची आध्यात्मिक संस्कृती व तत्त्वज्ञान पुढे नेण्याची जबाबदारी लोकांवर आहे. आपण आपले सण उत्सव साजरे केले पाहिजेत. त्याचा वैज्ञानिक अर्थही लक्षात घेतला पाहिजे, असे ते म्हणाले.  लोकांना त्यांनी यावेळी सोमवारी होणाऱ्या जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या.

मोदी म्हणाले की, गुजरातमधील केवडिया येथे काही रेडिओ जॉकी संस्कृतला उत्तेजन देत आहेत. संस्कृत ही प्राचीन भाषा असून त्यात बरेच ज्ञान सामावलेले आहे. यातून राष्ट्रीय एकतेलाही बळ मिळत आहे. मोदी यांनी नागरिकांना करोना निर्बंधांचे  पालन करण्याचे आवाहनही केले.

स्वच्छ भारत’ संकल्पाचा विसर नको

स्वच्छ भारत अभियानाच्या संकल्पाचा कधीही विसर पडू देऊ नये, असे सांगून विविध ठिकाणी  याबाबत चाललेल्या प्रयोगांची मोदी यांनी प्रशंसा केली. करोना काळात स्वच्छ भारत संकल्पाबाबत चर्चा थोडी मागे पडली होती, पण तसे करून चालणार नाही. देशाच्या उत्थानात सर्वाचे प्रयत्न कसे उपयोगी पडतात हे यातून दिसून आले आहे. यातून नवीन काही तरी करण्याची ऊर्जा मिळते,  असे ते म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी स्वच्छ भारत अभियानात प्रथम आलेल्या इंदूरचे कौतुक केले. सुखेत प्रारूपाच्या मदतीने बिहारमधील मधुबनी येथे जे काम  चालले आहे त्याचाही उल्लेख केला.तमिळनाडूतील शिवगंगा येथे कान्जीरगाल पंचायतीच्या कामाचा उल्लेख केला.


....................................
------------------------------

www.freshnewz.in


टिप्पण्या