जनआशीर्वाद यात्रेत करोना नियम पायदळी

जनआशीर्वाद यात्रेत करोना नियम पायदळी
बॅनरबाजीने विद्रुपीकरण, परवानगीशिवाय गर्दी, आयोजकांवर गुन्हा
उल्हासनगर : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या नवनियुक्त केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या आयोजकांवर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या यात्रेच्या निमित्ताने उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरात करोनाचे नियम शासकीय अधिकारी आणि पोलिसांच्या उपस्थितीत पायदळी तुडवले जात असल्याचे चित्र होते. तीनही शहरांमध्ये मोठय़ा प्रमाणावर विना परवानगी बॅनरबाजी करण्यात आली होती. त्यामुळे नियमांचा अडसर फक्त सर्वसामान्यांसाठीच की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
केंद्रात नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या केंद्रीय मंत्र्यांना आपापल्या जिल्ह्य़ात जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने जनमानसात जाण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील एकमेव केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनीही १६ ऑगस्टपासून जिल्ह्य़ात जनआशीर्वाद यात्रा काढली. ही यात्रा बुधवारी उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरांतून मार्गक्रमण करत गेली. या यात्रेच्या तिसऱ्या दिवशीही ठिकठिकाणी करोनाचे नियम पायदळी तुडवण्यात आल्याचे दिसून आले. उल्हासनगर शहरात विविध ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी मुखपट्टीशिवाय मंत्री महोदयांचे स्वागत केले. अंबरनाथ शहरात कपिल पाटील यांनी प्रवेश करताच भाजप पश्चिमचे शहराध्यक्ष मुखपट्टीशिवाय स्वागत करत असताना खुद्द पाटील यांनी त्यांच्या तोंडाला खांद्यावरील मफलर लावून तोंड बंद करण्याचा सल्ला दिला. तर बदलापूर शहरातही मुखपट्टी नसेल तर सत्कार स्वीकारणार नाही, अशी तंबी मंत्री कपिल पाटील देताना दिसले. अनेक ठिकाणी त्यांनी मुखपट्टी नसलेल्या पदाधिकाऱ्यांचे सत्कार मुखपट्टीशिवाय स्वीकारले नाहीत. मात्र यानिमित्ताने गर्दीच्या नियमांची पायमल्ली होताना दिसली. विशेष म्हणजे तालुक्याचे तहसिल प्रशासन आणि पालिकेचे अधिकारीही या यात्रेत मंत्री महोदयांच्या सत्कारासाठी हजर होते. या यात्रेला परवानगी देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे विनापरवानगी यात्रा काढणे, गर्दी जमवणे आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलमांखाली उल्हासनगर भाजपचे जमनुदास पुरस्वानी, अश्विनी मढवी आणि मनोज साधवानी या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर. बी. जाधव यांनी दिली आहे. दुपापर्यंत अंबरनाथ किंवा बदलापूर शहरात यात्रेप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.
चोरटय़ांचा डल्ला; ४ जणांना अटक
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या जनआशीर्वाद यात्रेतील गर्दीचा फायदा घेत भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे खिसे कापून रोकड, मोबाइल चोरणाऱ्या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. अबुबक्र अन्सारी (३५), नदीत अन्सारी (३०), आतिक अहमद (५१) आणि अश्याक अन्सारी (३८) अशी अटकेत अससेल्या आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून चोरलेली १ लाख १९ हजार रुपयांची रोकड, १० मोबाइल फोन आणि एक कार जप्त केली. चौघेही आरोपी मालेगाव येथील रहिवासी असून जनआशीर्वाद यात्रेत खिसे कापण्यासाठी ते कारने मालेगावहून ठाण्यात आले होते. संशय येऊ नये म्हणून चोरटय़ांनी भाजप पक्षाचे चिन्ह असलेल्या मुखपट्टय़ांचाही वापर केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने यात्रेमधील मोबाइल चित्रीकरण तपासून नंतर खबऱ्यांकरवी माहिती मिळवून त्यानंतर पोलिसांनी शिळफाटा येथील हॉटेलमधून चारही चोरटय़ांना ताब्यात घेतले.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
Comments
Post a Comment